Breaking News

संजय राऊत यांचा सवाल, आता ते जोडे कोणाला मारणार भाजपा प्रवक्ता की राज्यपालांना?

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिंदे गट, मनसे आणि भाजपाने राहुल गांधी यांच्यासह शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. तसेच राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. मात्र महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे वक्तव्य भाजपा प्रवक्ते आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. त्यावरून उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी भाजपा, शिंदे गटाच्या जोडो मारो आंदोलनाचा धागा पकडत म्हणाले, ज्या जोड्यांनी सावरकरांवर टीका करणाऱ्यांना मारलेत त्या जोड्यांनी आता भाजपाच्या प्रवक्त्यांना मारणार की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मारणार असा सवाल केला.

आज सकाळी संजय राऊत हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्यावर निशाणा साधला.

राज्यपालांनी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांबाबत जे अत्यंत दळभद्री विधान केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला आहे. त्याचवेळी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी आहेत, त्यांनी राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पाचवेळा औरंगजेबाची माफी मागितली असं विधान केलं आहे, हे प्रसारमाध्यमांच्या नजरेतून का सुटतं आहे मला कळत नाही? ही भाजपाची अधिकृत भूमिका आहे का? की वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करायचा. संभाजी राजांचा अपमान करायचा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळी कधी माफी मागितली. हे आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात जाहीर केलं पाहिजे. कारण ते भाजपाचे आता सहयोगी आहेत, ते मुख्यमंत्री आहेत असा खोचक टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.

वीर सावरकरांबाबत आपण रस्त्यावर उतरलात स्वागत आहे. जोडे मारले स्वागत आहेत. आता हे जोडे तुम्ही कोणाला मारणार आहात? भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्याला मारणार आहात की राज्यपालांना मारणार आहात? ज्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान असणाऱ्या शिवाजी महाराजांचा अशाप्रकारे घोर अपमान केला, असेही ते म्हणाले.

भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी आणि राज्यपाल कोश्यारी नेमके काय म्हणाले

राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत ‘आज तक’ने चर्चासत्र भरवलं होतं. या चर्चासत्रात भाजपाची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ता म्हणून सुधांशु त्रिवेदी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी आपली बाजू मांडताना सुधांशु त्रिवेदी म्हणाले, “सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती, असं सांगण्याचा प्रयत्न राहुल गांधींनी केला. त्या काळात अनेक लोकं प्राप्त परिस्थितीतून स्वत:ला बाहेर काढण्यासाठी माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. मग याचा अर्थ काय झाला? पण सावकरांनी ब्रिटीश संविधानाची शपथ तरी घेतली नव्हती असं वक्तव्य त्रिवेदी यांनी केलं आहे.

तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी औरंगाबादेतील कार्यक्रमात बोलताना म्हणाले, तुमचा आदर्श कोण आहे, असे जेव्हा पूर्वी विचारले जात असे तेव्हा, ‘जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस आणि महात्मा गांधी’ अशी उत्तरे दिली जात असत. परंतु, महाराष्ट्रात तुम्हाला आदर्श शोधण्याची गरज नाही, कारण इथे खूप आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील आदर्श होते, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि नितीन गडकरी हे नव्या काळातील आदर्श आहेत, असे वक्तव्य राज्यपाल कोश्यारी यांनी केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *