Breaking News

उदय सामंत यांची बैठकीनंतर माहिती, बारसू प्रकरणी उध्दव ठाकरे यांना ब्रिफींग हवे असेल तर…. उद्योग मंत्री सामंत आणि खासदार राऊत यांच्यात झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी बारसू येथे माती परिक्षण सुरू झाले. मात्र, हे माती परिक्षण सुरू होताच येथील ग्रामस्थांनी परिक्षणस्थळी आंदोलन पुकारले. या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक रहिवाशांना पांगविण्यासाठी महिला, मुलांसह सर्वांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे येथील परिस्थतीत तणाव निर्माण झाला. परंतु उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चर्चेची तयारी दाखविल्यानंतर तीन दिवसांसाठी आंदोलनकर्त्यांकडून आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली. मात्र या तीन दिवसात प्रकल्पासाठीचे माती परिक्षण थांबले पाहिजे अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिला. या पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत आज बैठक घेतली. या बैठकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतरावही उपस्थित होते.

या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना उदय सामंत म्हणाले, या प्रकरणात प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे होते, अशी सर्वांची अपेक्षा होती. आम्ही चार पाऊल पुढे टाकले आहेत. आंदोलनकर्त्यांना शंका होती की ३५३ सारखी गुन्हे लावली जातील, असे गुन्हे लावणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे सांगितले.

तसेच पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, त्या भागात काही जमिनी खरेदी केले आहेत, यामध्ये शासनाचे काही अधिकारी आहे. असं खासदारांनी आणि आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी तेथे जमीन प्रमाणाबाहेर घेतली असेल तर त्याची चौकशी केली जाईल. अनधिकृत जागेत जमीन घेतली असेल तर त्यांना निलंबित करण्यापर्यंतची कारवाई करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही स्पष्ट केले.

त्याचबरोबर उदय सामंत म्हणाले, शासनाने पुढचं पाऊल टाकलं आहे. तिथले लोक चर्चेसाठी तयार आहेत. अनेक लोकांशी माझी चर्चा झाली. विनायक राऊत यांच्यासोबत अजित यशवंतरावही उपस्थित होते. त्यांनीही तिथल्या लोकांशी संवाद साधला आहे. २ किंवा ३ तारखेला विस्तारीत बैठक मुंबईत करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला असल्याचेही सांगितले.

उद्धव ठाकरे यांनाही जर ब्रिफिंग आवश्यक असेल तर त्यांची वेळ घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. आमचे जिल्हाधिकारी, आयुक्त आजच त्यांच्याशी बोलतील. त्यांच्या शंकांचं निरसन करायचं असेल तर, आजपर्यंत जी कारवाई झाली, दडपशाही झाली त्याचं स्पष्टीकरण उद्धव ठाकरेंना केलं जाईल. शरद पवारांना जिल्हाधिकारी आणि एसबी साहेबांनी ब्रिफिंग केलं आहे. अजित पवारांनाही स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अन्य पक्षाच्या नेत्यांना ब्रिफिंग करण्याचे निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे, असेही सामंत यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले, आजही रत्नागिरी जिल्ह्यात येऊन सांगतोय की शेतकऱ्यांना त्रास द्यायचा नाही. मातीचं परिक्षण झाल्यानंतर प्रकल्प येणार की नाही येणार यावर शिक्कमोर्तब होणार आहे. अत्यंत संयमाने आज चर्चा झाली आहे. काल देखील सत्यजित चव्हाण यांच्याशीही चर्चा झाली आहे. हा प्रकल्प रेटून पुढे न्यायचा नाही. सगळ्यांचं समाधान करून, शेतकऱ्यांना न्याय देऊन प्रकल्प पुढे न्यायचा असल्याचे आश्वासनही यावेळी दिले.

माती परिक्षण थांबवण्याकरता गेलेल्या ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, हा दावा पालकमंत्री उदय सामंत यांनी फेटाळून लावला. एखाद्या ठिकाणी लोक आक्रमक झाली असतील तर पोलिसांसोबत झटापट होते. लाठीचार्ज केलेला नाही. लाठीचार्ज समूहाने केला जातो. त्यातही जर लाठीचार्ज झाला असेल तर त्याची चौकशी करू, असे आश्वासनही उदय सामंत यांनी दिले.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *