Breaking News

झोपडीधारकांना मिळणार आता ३०० चौ.फुटाचे घर राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी
राज्य सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन योजनेच्या माध्यमातून झोपडीधारकांना मिळणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी झोपु योजनेतून झोपडीधारकांना २६९ चौ.फुटाचे घर देण्यात येत होते. या क्षेत्रफळात आता वाढ करण्यात येणार असून २६९ ऐवजी ३०० चौरस फुटाचे घर झोपडीधारकांना देण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
मुंबई विकास आराखड्याला राज्याच्या नगरविकास विभागाकडून अंतिम मान्यता देताना ३३ (५), ३३ (१०), ३३(७) यासह पुर्नविकास करावयाच्या जवळपास सर्वच कायद्यात दुरूस्ती करण्याचा निर्णय घेतला. तसेच सुधारीत विकास आराखड्यास मान्यता देताना त्यावर मागविण्यात आलेल्या हरकती व सूचनांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार झोपु योजनेतून देण्यात येणाऱ्या घरांचे क्षेत्रफळ वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबईतील बीडीडी चाळ आणि धारावी पुर्नवसन प्रकल्पामध्ये फक्त वाढीव क्षेत्रफळाची घरे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र आता झोपु योजनेतील घरांच्या क्षेत्रफळात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने झोपडीधारकांना मोठ्या आकाराची घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे एसआरए योजनेतील जवळपास १५०० ते २००० पुर्नविकास प्रकल्पातील लाखो नागरीकांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विकासकांनाही मोठ्या प्रमाणात ही योजना राबविताना चटई निर्देशांक आणि टीडीआर वापरावास मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परंतु या निर्णयामुळे अनेक प्रकल्पांचे आराखडे पुन्हा नव्याने बदलावे लागणार असून उपलब्ध लोकांच्या संख्येनुसार त्यात काही फेरफार ही करावे लागणार आहे. याशिवाय एसआऱएच्या नियमावलीत ही दुरूस्त्या करण्याचे काम सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

महापारेषणच्या पडघे-कळवा उपकेंद्रात भार वाढल्यामुळे वीजपुरवठा खंडित

महापारेषणच्या कळवा उपकेंद्रात आज दुपारी २ वाजून २५ मिनिटांनी ४०० के. व्ही. अति उच्च दाब …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *