Breaking News

दुषित भाज्यांची विक्री रोखण्यासाठी शेतकरी केंद्रे सुरू महापालिकेला केंद्रे सुरु करण्याबाबत सूचना करण्याचे नगरविकास राज्यमंत्र्याचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी

शहरातील अनधिकृत फेरिवाल्यांद्वारे दुषित भाज्यांची विक्री केली जात असल्याप्रकरणी सांताक्रुज येथील वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दुषित भाज्यांच्या विक्रीला चाप बसून नागरिकांना चांगल्या दर्जाची भाजी मिळावी यासाठी विरोधी पक्षनेत्यांच्या सुचनेनुसार शेतकरी केंद्रे सुरू करण्याच्या सुचना मुंबई महापालिकेला केली जाणार असल्याचे आश्वासनही नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी दिले.

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील सांताक्रुझ परिसरातील फेरिवाल्यांनी मुंबई महापालिकेच्या पथकाची कारवाई टाळण्यासाठी भाज्यांच्या गोण्या रस्त्याशेजारील नाल्यांमध्ये लपवल्याची बाब गेल्या महिन्यांत निदर्शनास आली होती. ही बाब नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक असून या विरोधात अजूनही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याकडे विधानसभेत भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला.

रेल्वेस्थानक परिसरातील फेरिवाल्यांवर कारवाई केल्याने अनेक छोट्या मोठ्या गुन्ह्यांना त्यामुळे आळा बसला आहे. त्यामुळे अनधिकृत फेरिवाल्याविरोधातील ही कारवाई सुरूच ठेवत त्यांच्याऐवजी महिला बचत गटांना संधी द्यावी अशी मागणीही मनिषा चौधरी यांनी केली.

नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मध्यंतरी दहा हजार अनधिकृत फेरिवाल्यांच्या विरोधात आम्ही कारवाई केली होती. तशाच स्वरुपाची कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी चर्चेत भाग घेताना केली. तसेच आपल्या सरकारच्या काळात ज्या पद्धतीने आम्ही भाजी विक्रीसाठी शेतकरी केंद्रे सुरू केली होती. त्याच पद्धतीने आताही निर्णय घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.

योगेश सागर यांनी टाऊन वेंडींग कमिटीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश करावा, अशी मागणी केली. त्यावर विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी शेतकरी विक्री केंद्रांबाबत केलेली सुचना मुंबई महापालिकेला केली जाईल असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांनी आपल्या उत्तरात दिले.

 

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *