Breaking News

ठाणे व एमएमआर प्रदेशाच्या विकासाचे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे एमएमआरडीएला आदेश

मुंबई: प्रतिनिधी
ठाणे आणि एमएमआर प्रदेशातील अन्य शहरांची गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढ झाली असून त्या तुलनेत येथील पायाभूत सुविधा विकासांचे प्रकल्प प्रलंबित आहेत. त्यामुळे या संपूर्ण परिसराच्या विकासाला चालना देणारे प्रकल्प फास्ट ट्रॅकवर आणण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी एमएमआरडीएला दिले. यामध्ये पूर्व मुक्त मार्गाचा घाटकोपर पासून ठाण्यापर्यंत विस्तार, तीन हात नाका रिमॉडेलिंग, आनंद नगर नाका ते साकेत एलिव्हेटेड महामार्ग, कोपरी ते पटणी खाडी पूल, कोलशेत ते गायमुख खाडी मार्ग, तसेच कोलशेत, कासारवडवली आणि गायमुख येथे खाडीपलिकडील भागांना जोडणारे खाडी पुल, नवीन ठाणे ग्रोथ सेंटर आदी महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांच्या जलद अमलबजावणीसाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देशही त्यांनी एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव यांना दिले.
सोमवारी या सर्व प्रकल्पांचे सविस्तर सादरीकरण झाले. ठाण्याचे आमदार या नात्याने शिंदे स्वतः गेली अनेक वर्षे सातत्याने या प्रकल्पांचा पाठपुरावा राज्य सरकार आणि एमएमआरडीएकडे करत होते. पुणे, नाशिक, अहमदाबाद, जेएन पीटी अशा विविध ठिकाणांकडे जाणारी सर्व वाहतूक ठाणे शहरातून जात असल्यामुळे ठाण्यातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवट ठाण्याजवळ होणार आहे, तसेच भिवंडी व कल्याण परिसरात एमएमआरडीएमार्फत ग्रोथ सेंटर विकसित करण्यात येणार असल्यामुळे वाहतुकीची समस्या अधिकच बिकट होणार आहे. या बाबी लक्षात घेऊन या प्रकल्पांची आखणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पांच्या सादरीकरणाबाबत समाधान व्यक्त करून हे सर्व प्रकल्प फास्ट ट्रॅकवर घेण्याचे निर्देश दिले, तसेच यासाठी नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचेही आदेश दिले.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी आदी परिसराचा जीव गेली काही वर्षे वाहतूक कोंडीमुळे मेटाकुटीला आला आहे. या सर्व प्रकल्पांसाठी गेली अनेक वर्षे आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी निकाली निघेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. भविष्यातील वाढ लक्षात घेऊन या सर्व प्रकल्पांचे नियोजन केले असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा सुधारित आराखडा लवकर
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाच्या भिवंडी ते कल्याण टप्प्याच्या आरेखानाबाबत असंख्य तक्रारी होत्या. कल्याणचा फार थोडा भाग मेट्रोने जोडला जाणार असल्यामुळे बहुसंख्य कल्याणवासीय या मेट्रोपासून वंचित राहिले असते. त्यामुळे या मार्गाचे आरेखन बदलण्याचे निर्देश श्री. शिंदे यांनी एमएमआरडीएला दिले होते. सुधारित आरेखन तयार करण्यात आले असून या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *