Breaking News

पावसाळ्यात मुंबईची तुंबई होवू नये यासाठी आपतकालीन यंत्रणा सज्ज अधिक समन्वय ठेवून अडचणींवर मात करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी

गतवर्षी पावसाळ्यामध्ये आलेल्या आपत्ती व अडचणींना तोंड देत यावर्षी त्यावर मात करण्यासाठी सर्वच यंत्रणांनी परिपूर्ण तयारी केली आहे. शासनाच्या विविध यंत्रणांनी या काळात अधिक समन्वय ठेवून अडचणींवर मात करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व  मॉन्सूनपुर्व तयारी बाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. मदत व पुर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव दिनेश कुमार जैन आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी पावसाळा पुर्वीच्या तयारीबाबत विविध यंत्रणांनी केलेल्या तयारीचा समग्र आढावा घेतला. मुंबई महापलिका, हवामान विभाग, भारतीय सेना, भारतीय वायू सेना, भारतीय नौसेना त्याचबरोबर राज्यातील विभागीय आयुक्त यांनी आपत्ती निवारणासाठी घेतलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, यावर्षी राज्यामध्ये पर्जन्यमान चांगले होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ही सर्वांसाठी दिलासा देणारी बाब असून या काळात आपत्ती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी यंत्रणांनी चांगली तयारी केली आहे. गेल्या वर्षी आलेल्या अडचणींवर मार्ग काढतानाच या वर्षीच्या नियोजनात त्याचे प्रतिबिंब दिसून येत आहे. मुंबईत गेल्या वर्षी पाणी साचण्याच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडल्या. या घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रीत झाल्याने यावर्षी अशा ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. नालेसफाई, रस्त्यांवरील खड्डे यासाठी मुंबई महापालिकेने विशेष नियोजन केल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रोच्या कामांमुळे पाणी साचेल अशी चर्चा आहे. त्यावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने यासाठी विशेष दक्षता घेऊन उपाययोजना केली आहे. असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यबरोबरच विशेष करुन मुंबईमध्ये सर्वच यंत्रणांनी पावसाळ्यामध्ये अधिक समन्वय राखत आपत्ती उद्भवल्यास सक्षमपणे तोंड द्यावे. राज्य शासनाकडून यंत्रणांना आवश्यक ती मदत पुरवली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

हवामान विभागाचे उपसंचालक के.एस.घोसाळीकर यांनी सादरीकरणा दरम्यान सांगितले की, मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन झाले असून महाराष्ट्रात ९६ ते १०४ टक्के पावसाचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात जुनमध्ये सर्वाधिक पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला.

पावसाळ्यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या उपाययोजना :

  • शहरात पावसाचे पाणी साचण्याचे २२५ ठिकाणे आढळून आली आहेत. त्यातील १२० ठिकाणांवर उपाययोजना करण्यात आली आहे. यामध्ये पुर्व उपनगरातील ७४, पश्चिम उपनगरातील ८८ तर मुंबई शहरातील ६३ अशी २२५ ठिकाणे आहेत.
  • शहरात पावसाचे पाणी उपसा करणारी २९८ पंप यावर्षी बसविण्यात आले असून शहरात १०२, पुर्व उपनगरात ९६ आणि पश्चिम उपनगरात १०० अशी त्यांची संख्या आहे. तासाला १ हजार घनमिटर पाणी उपसा करणारी उच्च दाबाचे पंप प्रथमच बसविण्यात आले आहेत.
  • मुंबईत २५० किलोमिटर लांबीचे नाले असून ९५ टक्के नाले सफाईचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ३१ पुर्वी केले जाईल.
  • मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गालगतच्या भूमीगत गटारांमध्ये यावर्षी कॅमेरे बसविण्यात आले असून त्याच्या सहाय्याने पाण्याचा होण्याऱ्या निचऱ्याची सचित्र माहिती मिळणार आहे.
  • त्याचबरोबर दहिसर, मिठी, पोईसर, ओशिवरा नदी, मोगरा नाला अशा सात ठिकाणी ट्रॅश बूम लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे पंपीग स्टेशनमध्ये प्लॅस्टिकचा कचरा जमा होणार नाही.
  • मुंबईत सात ठिकाणी रडारलेव्हल ट्रांन्समिटर बसविण्यात आले असून यामुळे मुंबईतील नदी आणि तलावांच्या पाण्याच्या पातळीबाबत माहिती उपलब्ध होणार आहे.
  • मुंबईतील १२०० मॅनहोल्सवर सुरक्षा जाळ्या बसविण्यात आल्या आहेत.
  • मुंबई महापालिकेचे १९४१ किलोमिटर लांबीचे रस्ते असून ३१ मे पुर्वी या रस्त्यावरील डागडूजीचे काम पुर्ण करण्यात येणार आहे. ६०० किलोमिटर लांबीच्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.
  • मुंबईत सी-१ वर्गाच्या ६८८ धोकादायक ईमारती असून त्या खाली करण्यासाठी नोटीस देण्यात आल्या आहेत.
  • पावसाळा व त्यासंबधी आजार आणि त्यामुळे उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता वैद्यकीय महाविद्यालये आणि परिसरातील रुग्णालयातील १३०० खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
  • मुंबईतील गिरगांव चौपाटी, शिवाजी पार्क, जुहु, वर्सोवा, अक्सा आणि गोराई या सहा बीचवर सुरक्षेसाठी ३६ जिवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

Check Also

फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांचे अप्रतिम छायाचित्रण

आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना कॅमेऱ्यातून फोटो क्लिक करताना पाहिले असेल, पण आम्ही तुम्हाला फूटपाथवर राहणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *