Breaking News

मुंबईतील सीसीटीव्ही डायल १०० शी जोडणार राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी
मुंबई शहराच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या असलेल्या सीसीटीव्ही प्रकल्पाची व्याप्ती वाढविण्यासह डायल १०० प्रकल्पाचे सीसीटीव्ही प्रकल्पाशी एकात्मिकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच या प्रकल्पासाठी येणाऱ्या ९८० कोटी ३३ लाख ८० हजार रूपये खर्चासही मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे मुंबई शहराच्या सुरक्षिततेला अधिक बळकटी मिळणार आहे.
मुंबई शहरावर २६ नोव्हेंबर २००८ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शहरात सीसीटीव्ही जाळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प राबविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय शक्ती प्रदान समिती स्थापन करण्यात आली. समितीने ६ जानेवारी २०१२ ला मुंबईसाठी ६०० कोटी रूपयांच्या सीसीटीव्ही प्रकल्पाला मंजुरी दिली होती. मात्र, या प्रकल्पाच्या निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने समितीने अतिरिक्त ३४९ कोटीच्या खर्चास मान्यता दिली होती. मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी या प्रकल्पाची व्याप्ती वाढविणे आवश्यक होते. त्यासाठी सीसीटीव्ही जाळे विस्तारित करण्यासाठी १० मे २०१६ ला उच्चस्तरीय शक्ती प्रदान समितीने प्रकल्पाची किंमत ९९६ कोटी निश्चित केली. त्यानुसार प्रकल्प सल्लागार कंपनीने अभ्यास करून निश्चित केलेल्या ९८० कोटी ३३ लाख ८० हजार २४ रूपये इतक्या किंमतीस मान्यता देण्यात आली. याशिवाय पोलीस आयुक्तालयांतर्गत डायल १०० हा मुंबई सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्प संचालित करण्यात येत असून एल.अँड.टी. यांच्यातर्फे त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. एकात्मिकरण करण्यात येत असलेल्या या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या ११.३९ कोटी रूपयांच्या खर्चासही समितीने मान्यता दिली असून हा खर्च सीसीटीव्ही प्रकल्प खर्चाच्या मर्यादेत आहे.

Check Also

फुटपाथवर राहणाऱ्या बेघर लोकांचे अप्रतिम छायाचित्रण

आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांना कॅमेऱ्यातून फोटो क्लिक करताना पाहिले असेल, पण आम्ही तुम्हाला फूटपाथवर राहणाऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *