Breaking News

अन्न व औषध प्रशासनाचे वराती मागून घोडे, उत्पादन बंद झाल्यानंतर परवाना रद्द

मागील काही दिवसांपूर्वी अमेरिकेत जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीकडून लहान मुलांसाठी बनविण्यात येणारी पावडर धोकादायक असल्याचे सिध्द झाले. त्यानंतर या कंपनीने ही पावडर बंद करण्याचा निर्णय घेत जगभरातून सदरची उत्पादने परत मागवून घेत पावडरचे उत्पादन बंद करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने जॉन्सन अँड जॉन्सन प्रा.लि. या बहुराष्ट्रीय कंपनीने उत्पादित केलेल्या ‘जॉन्सन बेबी पावडर’ या सौंदर्य प्रसाधनांचा परवाना १५ सप्टेंबर २०२२ पासून कायमस्वरूपी रद्द केला. त्यामुळे औषध प्रशासनाने वराती मागून घोडे दामटल्याची चर्चा सुरु झाली.

आंतरराष्ट्रीय पातळीवर या सगळ्या गोष्टी जाहीर झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक व पुणे येथील औषध निरीक्षकांनी तपासणीसाठी नमुने घेतले होते. शासकीय विश्लेषक, औषध नियंत्रण प्रयोगशाळा, मुंबई यांनी बेबी पावडरचे उत्पादन अप्रमाणित घोषित केल्याने ही कारवाई करण्यात आली.

‘जॉन्सन बेबी पावडर’ चा प्रामुख्याने नवजात बाळासाठी मोठ्या प्रमाणात वापर होतो. वरील उत्पादन पध्दतीमध्ये दोष असल्यामुळे सदर उत्पादनाचा सामू (PH) हा प्रमाणित मानकानुसार नाही. त्याच्या वापरामुळे नवजात शिशु व लहान मुलांच्या त्वचेस हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे उत्पादन सुरु ठेवणे हे जनहिताच्या दृष्टीने योग्य होणार नाही, त्यामुळे मुलुंड, मुंबई या उत्पादन कारखान्याचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

वरील अप्रमाणित घोषित नमुन्याच्या अनुषंगाने संस्थेची अनुज्ञप्ती रद्द का करण्यात येऊ नये ?अथवा नमूद केलेल्या परवान्या अंतर्गत मंजूर असलेल्या सौंदर्य प्रसाधनांची उत्पादन अनुमती निलंबित का करु नये? याबाबत कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. संस्थेस या उत्पादनाचा साठा बाजारातून परत बोलावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. वरील नमुन्याचे प्राप्त शासकीय विश्लेषकाचे अहवाल मान्य करण्यात आले नाहीत म्हणून संस्थेने औषध प्रयोगशाळेकडून फेरचाचणी होण्यासाठी नाशिक व पुणे न्यायालयात अर्ज केला होता.

केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडून सदरील फेरचाचणी नमुन्यांची चाचणी होऊन संचालक, केंद्रीय औषध प्रयोगशाळा, कलकत्ता यांनी अहवाल अप्रमाणित घोषित केल्याने परवाना रद्दची कारवाई करण्यात आली अशी माहिती गौरीशंकर ब्याळे सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन मुंबई यांनी दिली.

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *