Breaking News

बॅाक्सिंगवरचा ‘बेधडक’ करणार ‘दमछाक…’ संतोष मांजरेकर यांचा दिग्दर्शनाखालील बेधडक लवकरच भेटीला

मुंबई : प्रतिनिधी

अलीकडच्या काळात हिंदी सिनेसृष्टीत खेळ आणि खेळाडूंच्या जीवनावर आधारित असलेल्या सिनेमांची संख्या वाढली आहे, पण प्रादेषिक सिनेसृष्टीमध्ये अद्याप अशा प्रकारच्या सिनेमांची संख्या अत्यल्प आहेत असंच म्हणावं लागेल. मराठी सिनेसृष्टीही याला अपवाद नाही. ‘बेधडक’ हा आगामी सिनेमा लवकरच मराठी सिनेसृष्टीतील ही उणीव भरून काढणार आहे. बॅाक्सिंगवर आधारित असलेल्या ‘बेधडक’मधील ‘दमछाक…’ हे धडाकेबाज गीत अल्पावधीतच संगीतप्रेमींचं लक्ष वेधून घेणत यशस्वी ठरलं आहे.

कोणताही खेळ खेळण्यासाठी खेळाडूला अफाट कष्ट करावे लागतात, जीवतोड मेहनत ही करावीच लागते. एका बॉक्सरच्या घडण्याचं दर्शन घडवणारं ‘दमछाक…’ हे ‘बेधडक’ या चित्रपटातलं गाणं सोशल मीडियात चांगलंच लोकप्रिय होत आहे. दमदार शब्द, उत्तम संगीत आणि अप्रतिम छायांकन ही या गाण्याची वैशिष्ट्य आहेत. राही प्रॉडक्शन्सच्या मंदार गोविंद टावरे यांची निर्मिती असलेला ‘बेधडक’ हा सिनेमा १ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. गोविंद टावरे यांचं  चित्रपट लेखन, सुरेश देशमाने यांची उत्तम सिनेमॅटोग्राफी तर ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘सुराज्य’ असे दर्जेदार चित्रपट बनविणाऱ्या संतोष मांजरेकर याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

‘दमछाक…’ या गाण्यात बॉक्सर कशा पद्धतीन घडतो याचं चित्रण करण्यात आलं आहे. आपल्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करणं, त्याबरोबरच दमणं, खचणं, चिडचिड करणं या सगळ्या भावभावना या गाण्यात टिपल्या आहेत. उच्च दर्जाच्या सिनेमॅटोग्राफीमुळे हे गाणं पाहण्याचा अप्रतिम अनुभव मिळतो. त्यामुळेच या गाण्याला सोशल मीडियात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याविषयी संतोष म्हणाला की, ‘दमछाक…’ हे गाणं खूप इंटरेस्टिंग आहे. त्यात एक प्रवास मांडण्यात आला आहे. खेळाडू कसा घडतो याचं हे एक प्रकारे दर्शन आहे. ‘बेधडक’ हा खेळावर आधारित चित्रपट असल्यानं तो तितक्याच उत्तम पद्धतीनं चित्रीत करणं गरजेचं होतं. निर्माते मंदार गोविंद टावरे यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानं चित्रपटाच्या निर्मितीमूल्यांमध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही.

या सिनेमाद्वारे गिरीश टावरे या नवोदित अभिनेत्याचं चंदेरी दुनियेत पदार्पण होत आहे. त्याच्या साथीला अशोक समर्थ, गणेश यादव, सुश्रुत मंकणी, अनंत जोग, प्रसाद लिमये, नम्रता गायकवाड, स्नेहा रायकर, पूनम फणसे आदी कलाकारांची फळी या सिनेमात आहे. मंगेश कांगणे, गोविंद टावरे आणि प्रवीण बांदेकर यांनी लिहिलेल्या गीतांना प्रवीण बांदेकर यांचे संगीत लाभले असून, आदर्श शिंदे, सिद्धार्थ महादेवन, बेला शेंडे, आनंदी जोशी, प्रवीण बांदेकर यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *