Breaking News

२२ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरु: हि मार्गदर्शक तत्वे प्रेक्षक-थिएटर मालकांसाठी सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील चित्रपटगृहे २२ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु होणार आहेत. राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अधीन राहून नियंत्रित स्वरुपात चित्रपटगृहे सुरु करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

राज्यातील कोविड-19 पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली होती. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ११ ऑक्टोबर २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून यामध्ये चित्रपटगृहांनी पाळावयाची सर्व मार्गदर्शक तत्वे नमूद करण्यात आली आहेत. या शासन निर्णयातील मार्गदर्शक सुचनांनुसार प्रतिबंधित क्षेत्रात चित्रपटगृहे बंद असतील. चित्रपटगृहे सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तर चित्रपटगृहे मालकांना राज्य शासनाच्या महसूल आणि वने विभाग, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक आरोग्य विभागाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक राहील.

याशिवाय चित्रपटगृहांमध्ये वेळोवेळी ऑडिटोरिअम, कॉमन एरिया आणि वेंटिग एरिया यामध्ये एकदम गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमध्ये सिनेमा पाहण्यास  येणाऱ्या प्रेक्षकांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. चित्रपटगृहांमध्ये सॅनिटायझर आत आणि बाहेर पडण्याच्या ठिकाणी, स्वच्छतागृहांमध्ये तसेच इतर ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. तसेच चित्रपटगृहांमध्ये येणारे प्रेक्षक कुठेही थुंकणार नाही याची दक्षता घ्यावी, आणि आत येणाऱ्या प्रेक्षकांचे थर्मल चेकअप करणे आवश्यक आहे. तसेच प्रेक्षकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण झाले असणे अथवा आरोग्य सेतुवरील त्यांची आरोग्य स्थिती “सुरक्षित” अशी दर्शविलेली असणे आवश्यक राहील. याशिवाय प्रेक्षकांची गर्दी होऊ नये यासाठी प्रेक्षकांनी ठराविक ठिकाणी कसे उभे राहावे याबाबत आखणी करण्यात यावी. तसेच सिनेमागृहांमध्ये बाहेर पडत असताना गर्दी होणार नाही याची काळजी सुध्दा घेणे आवश्यक आहे. मल्टीप्लेक्समध्ये अनेक सिनेमे वेगवेगळया पडदयांवर दाखवले जातात, अशा वेळी मध्यंतर एकाच वेळी येणार नाही याची काळजी घेण्यात यावी जेणेकरुन प्रेक्षकांची गर्दी होणार नाही.

सिनेमागृहांमध्ये काम करणारे कर्मचारी खाद्य पदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी कार्यरत कर्मचारी, सफाई कर्मचारी यांचे सुध्दा लसीकरण करणे आवययक आहे. शॉपिगमॉलमध्ये प्रवेशासाठी पूर्ण लसीकरण हे नियम ठरिवण्यात आले असले तरी मॉलमधील मल्टीप्लेक्समध्ये येणाऱ्या  प्रेक्षकांना चित्रपटगृहांच्या तिकिटावर मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल.

सिनेमागृहे ५० टक्के आसनक्षमतेने सुरु करण्यात येणार

सिनेमागृहे आणि मल्टीप्लेक्समध्ये प्रेक्षकांची ५० टक्के आसनक्षमता असेल. याचाच अर्थ दोन प्रेक्षकांमध्ये एका खुर्चीचे अंतर ठेवण्यात यावे. तसेच ५० टक्के आसनक्षमता असताना सिनेमागृहांमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. ज्या ठिकाणी प्रेक्षक बसणार नाहीत त्या खुर्चीवर क्रॉस मार्किंग करणे आवश्यक आहे. ऑनलाईन तिकिट काढताना आणि तिकीट खिडकीवर तिकीट काढताना ज्या खुर्च्यावर बसू नये असे मार्किंग करण्यात आले आहे ते नमूद करणे आवश्यक आहे. सिनेमागृहांतील पार्किंगच्या ठिकाणी सुध्दा आणि सिनेमागृहांतील लिफ्टमध्ये सुध्दा गर्दी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मल्टीप्लेक्समधील सिनेमांच्या वेळा वेगवेगळया ठेवून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात यावे. तिकीट खिडकीवर गर्दी होऊ नये यासाठी डिजिटल पध्दतीने तिकीट बुकींगवर भर देण्यात यावा. तसेच सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये तिकीट काढताना तिकीट खिडकीवर गर्दी होणार नाही याची काळजी घेऊन आवश्यक तितक्या तिकीट खिडक्या उघडण्यात याव्यात.मल्टीप्लेक्समध्ये सुध्दा फ्लोअर मॅनेजमेंट करुन गर्दी टाळण्यात यावी.

चित्रपटगृहांमध्ये संपूर्ण जागेचे सॅनिटाईझेशन करण्यात यावे. सिनेमागृहांमधील प्रत्येक स्क्रिनिंग नंतर सॅनिटायझेशन करण्यात यावे. खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, कर्मचाऱ्यांचे बसण्याचे ठिकाणी, स्वच्छतागृहे यांची साफसफाई नियमितपणे करण्यात यावी. सॅनिटायझेशन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पीपीई कीट देणे, बुटस, ग्लोज्व्ह, मास्क देण्यात यावे. कोविड संसर्गाचा एक व्यक्ती आढळल्यास त्या जागेचे निर्जंतुकीकरण तात्काळ करण्यात यावे. सिनेमागृहांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. सिनेमागृहांमध्ये काम करणारे ज्येष्ठ कर्मचारी, दिव्यांग कर्मचारी, गरोदर महिला यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.या कर्मचाऱ्यांनीही आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे आवश्यक असून या कर्मचाऱ्यांचे दोन डोसचे लसीकरण होऊन १४ दिवसांपेक्षा जास्त कालावधी असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांनी आपली आरोग्य तपासणी नियमित करावी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

याशिवाय सिनेमागृहांमध्ये मोक्याच्या ठिकाणी काय करावे आणि काय करु नये याची माहिती थोडक्यात नमूद करणारे बोर्ड लावणे आवश्यक आहे. हे बोर्ड स्वच्छतागृहे, तिकीट खिडकीजवळ, सिनेमागृहांमध्ये आत येताना, खाद्यपदार्थांच्या स्टॉलजवळ लावणे आवश्यक आहे. तसेच सिनेमागृहांमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांना नियमांची माहिती करुन देण्यासाठी माहिती देणारा ऑडिओ संदेश देण्यात यावा. याशिवाय ठिकठिकाणी पोस्टर्स, स्टॅण्डीज यांची उभारणी करण्यात यावी. याशिवाय सिनेमा सुरु होण्यापूर्वी जनहितार्थ कोविड नियमांची माहिती तसेच इतर आवययक माहिती ऑडिओ व्हिज्युअल क्लिप मधून देण्यात यावी.

सिनेमागृहांमधील एअर कंडिशन, व्हेंटिलेशन हे ठरवून दिलेल्या मार्गदर्शक नियमांनुसार असणे आवश्यक आहे. सिनेमागृहांमधील एअर कंडिशन २४ ते ३० सेल्सिअस टेपरेंचर इतका असावा. ह्युमिडीटीची रेंज ४० ते ७० टक्के असावी. सिनेमागृहांमध्ये हवा येईल तसेच क्रॉस व्हेंटिलेशन होईल हे पाहण्यात यावे. सिनेमागृहांमध्ये एक्झॉस्ट फॅन्सची सोय असावी.

Check Also

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील “देव”ने घेतली पडद्यावरून एक्झीट ज्येष्ठ चित्रपट अभिनेते रमेश देव यांचे निधन, वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी ई-बातम्या टीम मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील देव म्हणून ओळखले जाणारे रमेश देव यांचा दोनच …

Leave a Reply

Your email address will not be published.