Breaking News

विजय पाटील यांच्या निधनाने संगीतातील राम-लक्ष्मण युगाचा अस्त हद्यविकाराच्या झटक्याने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन

मुंबई: प्रतिनिधी

आपल्या अवीट सुरांनी मराठी, हिंदी गाणी सुपरहिट आणि अजरामर करणारे राम लक्ष्मण जोडीतील लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचे आज वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराने नागपूर येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील संगीतातील राम लक्ष्मण युगाचा अस्त झाला.

सुरेंद्र हेंद्रे आणि विजय पाटील यांनी मिळून संगीतकार म्हणून आपल्या कामाची सुरुवात केली. तसेच या दोघांनी राम लक्ष्मण या नावाने संगीत देण्यास सुरुवात केली. यातील सुरेंद्र यांनी राम हे टोपण नाव तर विजय पाटील यांनी लक्ष्मण हे टोपणनाव धारण केले होते. सुरेंद्र यांचे निधन यापूर्वीच झाल्यानंतरही विजय पाटील यांनी राम लक्ष्मण या नावाने संगीत देणे सुरु ठेवले.

मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि दिग्दर्शक स्व.दादा कोंडके यांच्या जवळपास सर्वच चित्रपटांना राम लक्ष्मण यांनी संगीत दिले. हिंदी चित्रपटात संगीतकार म्हणून राजश्री प्रोडक्शनच्या सर्वेसर्वा तथा दिग्दर्शक सुरज बडजात्या यांनी मैने प्यार किया या चित्रपटासाठी दिला. या चित्रपटातील त्यांनी संगीतबध्द केलेली सर्वच गाणी सुपरहिट ठरली. त्यानंतर त्यांनी हम आपके है कौन, हम साथ साथ है या चित्रपटांनाही संगीत दिले. याही चित्रपटातील सर्वच गाणी सुपरहिट ठरली.

मैने प्यार किया चित्रपट संगीतासाठी १९८९ सालचा सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा फिल्मफेअर पुरस्कार राम लक्ष्मण यांना मिळाला. तर विजय पाटील यांच्यामुळेच सलमान खान यांच्या चित्रपटातील गाण्यासाठी एस.पी.बालासुब्रम्हणम् यांचा आवाज वापरण्यात येत होता. एकप्रकारे सलमान खान यांचा आवाज म्हणजे एस.पी.बालासुब्रमण्यम् हेच ठरले होते.

दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार, आगे की सोच आदीसह अनेक चित्रपटांचे संगीत त्यांनी दिले.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, अभिनेता सलमान खान आदींनी त्यांना आदरांजली वाहिली.

हिंदी चित्रपट संगीतातील राम – लक्ष्मण युगाचा अस्त “– अमित विलासराव देशमुख

“ज्येष्ठ संगीतकार विजय पाटील ऊर्फ लोकप्रिय  राम-लक्ष्मण जोडीतील  लक्ष्मण यांच्या निधनामुळे मनाला भावतील अशी अवीट गोडीची गाणी देणाऱ्या राम – लक्ष्मण युगाचा अस्त झाला आहे”, अशा शब्दांत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

“संगीतकार राम-लक्ष्मण या जोडीने, दादा कोंडके यांच्या अस्सल मराठी मातीतील  चित्रपटांपासून ते हिंदीतील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या मैने प्यार किया, हम आपके है कौन अशा अनेक चित्रपटांना दिलेले संगीत तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय होते. महाराष्ट्र शासनाच्या लता मंगेशकर पुरस्काराने त्यांच्या योगदानाचा उचित सन्मान करण्यात आला होता.  त्यांच्या संगीतातून ते कायम संगीत रसिकांच्या स्मरणात राहतील”, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *