Breaking News

हिंदवी स्वराज्याचा गुप्तहेर प्रसाद ओक फर्जंद चित्रपटात साकारणार गुप्तहेराची भूमिका

मुंबई : प्रतिनिधी

मागच्या आठवड्यात राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आणि आजवर अभिनेत्याच्या रूपात प्रेक्षकांना मोहिती घालण्यात यशस्वी झालेल्या प्रसाद ओकचं नाव दिग्दर्शक म्हणून गाजू लागलं. प्रसादने प्रथमच स्वतंत्रपणे दिग्दर्शित केलेल्या ‘कच्चा लिंबू’ या सिनेमाने सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमासाठी दिला जाणारा पुरस्कार पटकावत आपल्या चाहत्यांना सुखद धक्काच दिला. आता लवकरच प्रसाद एका ऐतिहासिक भूमिकेत आपल्या चाहत्यांना भेटणार आहे. ‘फर्जंद’ या आगामी मराठी सिनेमात प्रसादने हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीत छत्रपती शिवाजी महाराजांना अनमोल सहकार्य करीत हेरगिरीचं काम अगदी बेमालूमपणे करणाऱ्या गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारली आहे.

आजवरच्या कारकिर्दीत प्रसादने साकारलेल्या ऐतिहासिक भूमिकाही आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. वाचिक अभिनयाला यथोचित देहबोलीची जोड देत एखादी भूमिका रंगवण्याची कला चांगलीच अवगत असल्याने ऐतिहासिक व्यक्तिरेखांनाही न्याय देण्यात प्रसाद यशस्वी ठरतो. अभिनयातील याच गुणांमुळे प्रसादला ‘हिंदवी स्वराजाचे गुप्तहेर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारण्याची संधी आगामी ‘फर्जंद’ या ऐतिहासिक युद्धपटातून मिळाली आहे. १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘फर्जंद’चं लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर या नवोदित दिग्दर्शकाने केलं असून निर्मिती अनिरबान सरकार यांनी केली आहे. ‘स्वामी समर्थ मुव्हीज’ची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे सहनिर्माते संदिप जाधव, महेश जाऊरकर आणि स्वप्निल पोतदार आहेत.

शिवकालीन इतिहासातील बऱ्याच व्यक्तिरेखा आजवर कधीही खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेल्या नाहीत. ‘बहिर्जी नाईक’ हे शिवकालीन इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिरेखा आहे. महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखून स्वराज्य निर्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले. ते हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर होते. त्या काळातील १४ प्रांतांतील सर्व बोली मातृभाषेप्रमाणे त्यांना अवगत होत्या. वेषांतर करण्यात त्यांचा हातखंडा होता. इतकंच नव्हे तर काही ठिकाणी तर बहिर्जी एका व्यक्तीचं नाव होतं की टोळीचं हेसुद्धा ठामपणे सांगण्यात आलेलं नाही. त्यांच्याबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे आणि हेच त्यांचं खरं यश मानावं लागेल. हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीत बहिर्जी नाईक यांची मोलाची भूमिका होती. बहिर्जी नाईक यांची भूमिका प्रसादला चेहऱ्यावरील सहज बदलणाऱ्या हावभावांमुळे मिळाल्याचं लेखक-दिग्दर्शक दिग्पालचं म्हणणं आहे. त्यामुळे अशी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सुरुवातीपासून दिग्पालच्या मनात प्रसादचंच नाव होतं. प्रसादलाही भूमिका खूप आवडली. प्रसादने आपल्या अनोख्या शैलीत साकारलेल्या विविध रूपांमुळे चित्रपटाची रंगत वाढली आहे.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *