Breaking News

रंगभूमीची व्याख्या बदलणारे ज्येष्ठ नाटककार अल्काझी यांची एक्झीट राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याकडून आदरांजली

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी

भारतीय रंगभूमीची व्याख्या बदलणारे नाटककार आणि नाट्यसृष्टीत क्रांतीकारी बदल घडवणारे ज्येष्ठ नाटककार इब्राहिम अल्काझी यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची माहिती त्यांचे पुत्र फैसल अल्काझी यांनी दिली.

त्यांचा जन्म १९२५ मध्ये झाला होता. वयाच्या ९५ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी अनेक कलाकार  घडवले आहेत. १९६२ ते १९७७ या १५ वर्षांच्या कालावधीत ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक होते. १९४० च्या दशकात ते मुंबईत आले आणि अल्पावधीतच एक उत्तम अभिनेते म्हणून परिचित झाले. आज वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवल्याने भारतीय रंगमंचाबरोबरच जीवनाच्या रंगमंचावरून त्यांनी एक्झीट घेतली.

अलकाझी जेव्हा मुंबईत होते तेव्हा त्यांनी भारतीय रंगभूमीची ओळख ही शेक्सपिअर आणि ग्रीक नाट्यकृतींशी घडवली. या कलाकृती भारतीय रंगमंचावर आणल्या. त्यामुळे भारतीय रंगभूमीचा कायापालट होण्यास मदत झाली .ग्रीकच्या शोकांतिका, शेक्सपिअर, हेन्रिक इसबे, ऑगस्ट स्ट्रिंडबर्ग या नाटककारांची नाटकं त्यांनी भारतीय रंगभूमीवर आणली. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी एनएसडीतल्या संचालक पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर दिल्लीत जाऊन त्यांनी आर्ट हेरिटेज सुरु केलं. आर्ट हेरिटेजमध्ये त्यांनी त्यांच्या कलाकृती, फोटो आणि पुस्तकं ठेवली होती. अलकाझी यांचे वडील सौदी अरेबियातले तर आई कुवेतमधली होती. अलकाझी यांना नऊ भावंडे होती. त्यांचं बालपण पुण्यात गेलं. फाळणीनंतर अलकाझी यांचं कुटुंब पाकिस्तानात गेलं. मात्र अलकाझी यांनी इथेच राहण्याचा निर्णय घेतला. सुलतान बॉबी पदमसी यांचा नाटक ग्रुप त्यांनी जॉईन केला होता.

उत्कृष्ट संगीत, प्रकाश योजना, नेपथ्य यांची त्यांना उत्तम जाण होती. उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक तर ते होतेच. लंडनच्या रॉयल अॅकेडमी ऑफ आर्ट्समधून त्यांनी शिक्षण घेतलं होतं. विविध प्रतिभा त्यांच्या अंगी होत्या. ते उत्तम चित्रकार होते, उत्तम फोटोग्राफर होते. अंधायुग सारखं नाटक रंगमंचावर आणून त्यांनी नाट्यसृष्टीची परिभाषाच बदलली. प्रत्येक कलाकाराने समोर बसलेल्या प्रेक्षकाचा आदर केला पाहिजे आणि उत्तम अभिनय करायचा असेल तर शिस्त पाळली पाहिजे या मताचे ते होते.

“ख्यातनाम नाट्यकर्मी व नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक पद्मविभुषण इब्राहीम अल्काझी हे वैश्विक दृष्टीकोन लाभलेले नाट्यकर्मी होते. ते प्रतिभासंपन्न कलाकार, कलाप्रेमी व गुरु होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या संचालक पदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात त्यांनी कलाकारांच्या अनेक पिढ्या घडविल्या. त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके त्यांच्या अलौकिक बुद्धिमत्तेची साक्ष देतात. त्यांच्या निधनाने भारतीय कला नाट्य क्षेत्राने एक अद्भुत रत्न गमावले आहे”.

-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

 

भारतीय नाट्यसृष्टीचा कायापालट करणारे आणि रंगभुमीसह कला क्षेत्रातील अनेक दिग्गजांना घडविणारे युगप्रवर्तक असे इब्राहिम अल्काझी यांचे निधन चटका लावून जाणारे आहे. अल्काझींच्या निधनामुळे कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. अल्काझी यांचे भारतीय नाट्यसृष्टींचा कायापालट करण्यापासून ते आताच्या अनेक दिग्गज कलाकारांना घडविण्यात मोठे योगदान आहे. ते उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक तर होतेच पण तितकेच उत्तम चित्रकार, छायाचित्रकार आणि शिल्पकारही होते. लंडन मधून युरोपियन नाट्यशास्त्राचा अभ्यास करून परतल्यावर त्यांनी भारतातही नाट्यक्षेत्रात बदलांचे यूग आणले. कला क्षेत्रात त्यांनी ‘थियटर युनीट, जहाँगीर आर्ट गॅलरी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यांच्या माध्यमातून आयुष्यभर वेगवेगळे प्रयोग केले. मराठी रंगभुमीविषयी जिव्हाळा असणाऱ्या अल्काझी यांना आंतरराष्ट्रीय कलाक्षेत्रात मोठा सन्मान दिला जात असे. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित अल्काझी यांच्यासाठी कला क्षेत्र हेच श्वास होता.

-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

 

ख्यातनाम नाट्यकर्मी, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी संचालक, पद्मविभुषण इब्राहीम अल्काझी यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले  असून भारतीय नाट्य, कलासृष्टीतील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. पुणे येथे जन्मलेल्या इब्राहीम अल्काझी यांचं पुण्याशी, महाराष्ट्राशी आणि मराठी भाषेशी  विशेष नातं होतं. देश पातळीवर काम करताना त्यांनी अनेक प्रतिभासंपन्न कलाकार घडवले. भारतीय नाट्य आणि कलासृष्टी  समृद्ध करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

-उपमुख्यमंत्री अजित पवार

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न

बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *