Breaking News

विनोदाचे तीन एक्के प्रथमच दिसणार एकत्र नयना आपटे बनल्या दिनूच्या सासूबाई

मुंबई : प्रतिनिधी

‘जुनं ते सोनं’ म्हणत इतिहासजमा झालेली बरीच नाटकं आज नवं साज लेवून रंगभूमीवर येत आहेत. सुनिल बर्वेंच्या ‘हर्बेरियम’ने केलेली जुन्या नाटकांसाठी केलेली नवी पहाट बऱ्याच गाजलेल्या नाटकांना नवसंजीवनी देणारी ठरली आहे. याच धर्तीवर जवळजवळ चार दशकं रंगभूमीवर गाजलेलं बबन प्रभू यांचं ‘दिनूच्या सासुबाई राधाबाई’ हे नाटकही नव्या रूपात रसिकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे.

‘दिनूच्या सासुबाई राधाबाई’ या नाटकातील विनोदी फार्स नाट्यरसिकांना खिळवून ठेवण्यासाठी कारणीभूत ठरला होता. आता नव्याने सादर होणाऱ्या नाटकाला संतोष पवारसारख्या विनोदाची खरी जाण असणाऱ्या दिग्दर्शकाची साथ लाभल्याने एक वेगळंच रसायन पाहायला मिळणार आहे. जुन्या नाटकामध्ये नयनतारा यांनी राधाबाईंच्या व्यक्तिरेखेत रंग भरले होते, तर नव्या संचात सादर होणाऱ्या नाटकासाठी बालरंगभूमीसोबतच व्यावसायिक रंगभूमीसाठी तळमळीने काम करणाऱ्या नयना आपटे दिनूच्या सासुबाईंची भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे जुन्या नाटकात दिनूची शीर्षक भूमिका साकारणारे अभिनेते विनय येडेकरही या नाटकात दिसणार आहेत; परंतु ते डॅा. नाथ ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवरील विनोदाचे तीन एक्के प्रथमच एकत्र रंगभूमीवर येणार आहेत. संतोष पवार स्वत: या नाटकात दिनूच्या भूमिकेत दिसणार आहे.

बबन प्रभूंनी लिहिलेल्या या नाटकात फारसे बदल करायला वाव नव्हता. परंतु काळानुरूप आवश्यक असणारे सर्व बदल करताना अधे मधे राहिलेल्या काही बारीकसारीक जागा प्रसंगानुरूप आणि शाब्दिक विनोदांच्या माध्यमातून भरण्याचं काम संतोषने केलं आहे. याखेरीज सेटमध्ये बदल करून जुन्या नाटकात जे सीन्स केवळ संवादांच्या माध्यमातून सादर करण्यात आले होते ते नव्या नाटकात प्रत्यक्षात रंगमंचावर सादर करण्यात येणार आहेत. एक गाजलेलं नाटक नवीत संचात सादर करताना मूळ गाभ्याला धक्का न लावता आजच्या पिढीला आवडेल अशा शैलीत दिग्दर्शित करण्याचं आव्हान असल्याचं संतोष म्हणाला. जुन्या नाटकात दिनूची भूमिका साकारल्यानंतर नव्या नाटकात आपण स्वत:हून डॅा. नाथ ही व्यक्तिरेखा संतोषकडे मागितल्याचं येडेकर म्हणाले. राधाबाईंच्या भूमिकेचं टायमिंग अचूकपणे साधताना पूर्वी सादर झालेल्या राधाबाईंपेक्षा वेगळ्या दिनूच्या सासुबाई सादर करण्याचा प्रयत्न केल्याचं नयना आपटे म्हणाल्या.

१ एप्रिल रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईत सादर केला जाणार आहे. गोपाळ अलगेरी यांनी या नाटकाच्या निर्मितीचं शिवधनुष्य उचललं आहे. साई-पियुष या संगीतकार जोडीने या नाटकाला वेगळ्या धाटणीचं संगीत देण्याचा प्रयत्न केला आहे. संगीतकार डॅा. अभिनय देसाई यांनी या नाटकाच्या शीर्षक गीताला स्वरसाज चढवला आहे. श्री विश्वस्मै प्रोडक्शन्स आणि वेद प्रोडक्शन्सची निर्मिती असलेल्या या नाटकात विलास देसाई, इरावती लागू, रौनक शिंदे, वैभवी देऊलकर-धुरी, ऋतुंधरा माने, दीपश्री कांबळे आदी कलाकारांनी अभिनय केला आहे. नेपथ्य प्रसाद वालावलकर यांचं आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *