Breaking News

पुणे-अहमदनगर-नाशिककरांसाठी खुषखबर: लवकरच बुलेट ट्रेन महारेलच्या माध्यमातून होणार प्रकल्प पूर्ण

मुंबई: विशेष प्रतिनिधी

मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागपूर ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन सुरु करण्याबाबतची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केल्यानंतर आता पुणे-अहमदनगर-नाशिक दरम्यान आणखी एक बुलेट ट्रेन सुरु करण्यासंदर्भातील हालचाली युध्दपातळीवर सुरु असल्याची विश्वसनीय माहिती नुकतीच हाती आली आहे.

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन सुरु करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर आता तो बासनात पडला असतानाच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नागपूर ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन सुरु करण्याबाबत हालचाली सुरु केल्याने हा एकप्रकारे भाजपाला शह देण्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. पुणे नाशिक अहमदनगर दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी केंद्रीय रेल्वे विभाग आणि राज्य सरकारच्यावतीने महारेल नावाची कंपनी स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी लागणारा निधीही रेल्वे विभाग आणि राज्य सरकारकडून संयुक्तरित्या निधी उभारण्यात येणार असल्याची माहिती मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

या प्रकल्पासाठी लागणाऱ्या रेल्वे ट्रॅकचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. तसेच त्यासाठी लागणाऱ्या जमिन अधिग्रहणाची प्रक्रियाही लवकरच सुरु करण्यात येणार आहे. तसेच त्यासाठी लवकरच या भागातील जमिन अधिग्रहणासाठी लवकरच जाहिरातही प्रकाशित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देवून या जमिनींचे अधिग्रहण करण्यात आल्यानंतरच सदर प्रकल्पाचे काम सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागपूर ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पानंतर हा दुसरा बुलेट ट्रेनचा प्रकल्प राज्यात सुरु होणार आहे. या प्रकल्पासाठी साधारणत: साडेतीन ते चार हजार कोटींचा खर्च येणार असून यासाठी लागणारा निधी रेल्वे विभाग आणि राज्य सरकारकडून संयुक्तरित्या उभारण्यात येणार आहे. याशिवाय या प्रकल्पाचे नियोजन आणि अंमलबजावणी ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिपत्याखालील विभागाकडून करण्यात येत असून त्यासाठी महारेल या कंपनीच्या माध्यमातून याचा अंतिम आराखडा तयार करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

या बुलेट प्रकल्पामुळे पुणे-नाशिक-अहमदनगर ही तिन्ही शहरे आणखी जवळ येणार असून या भागातील औद्योगिक आणि विकासाला चांगलीच चालना मिळणार आहे. त्याचबरोबर मुंबईनंतर सध्या पुणे शहरावर पडणारा अतिरिक्त लोकसंख्येचा भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *