Breaking News

विद्यार्थ्यांसाठी आता आठवड्यातील प्रत्येक शनिवार होणार ‘आनंददायी शनिवार’

विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्यवृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा या हेतूने राज्य मंडळाच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आठवड्यातील प्रत्येक शनिवारी ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

तर्कसंगत विचार आणि कार्य करण्यासाठी सक्षम असणाऱ्या तसेच करुणा, सहानुभूती, साहस, लवचिकता, वैज्ञानिक चिंतन, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्य असणाऱ्या उत्तम मनुष्यत्वाचा विकास हा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा उद्देश आहे. सध्याच्या काळात लहान वयातही विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासीनता, नैराश्य या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शालेय जीवनात ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम राबविल्यास विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभिरुची वाढीस लागेल. त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. विद्यार्थ्यांचे गळती व अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होईल तसेच विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जाऊन त्यांचे उत्तम अध्ययन होईल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

उपक्रमाचा उद्देश

विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्ये विकसित करणे, शालेय स्तरावर ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे, संभाषण कौशल्य विकसित करणे, आत्मविश्वास व नैराश्येवर मात करण्याची क्षमता निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

आनंददायी शनिवार या उपक्रमामध्ये प्राणायाम / योग/ ध्यान-धारणा / श्वसनाची तंत्रे, आपत्ती व्यवस्थापनातची मुलतत्वे व व्यावहारिक प्रशिक्षण, दैनंदीन जीवनातील वित्तीय व्यवस्थापन, स्वतःच्या आरोग्याची रक्षण करण्यासाठी उपाययोजना, रस्ते सुरक्षा, समस्या निराकरणाची तंत्रे, कृती, खेळ यावर आधारित उपक्रम, Mindfulness वर आधारित कृती व उपक्रम, नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य आदी कृतींचा समावेश असेल. या कृतींसोबत इतर तत्सम प्रकारच्या नाविन्यपूर्ण कृतींचा समावेश करण्याची मुभा शाळांना असणार आहे.

आनंददायी शनिवार हा उपक्रम राबवत असतांना प्रत्येक शनिवारी प्रचलित वर्गाऐवजी विद्यार्थ्यांचा शनिवार हा वरील कार्यपद्धतींद्वारे आनंददायी स्वरुपाचा होण्याच्या दृष्टिने शालेय शिक्षण आयुक्त आणि राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेचे संचालक यांच्यामार्फत एकत्रितपणे रुपरेषा तयार करून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Check Also

भारतीय राज्यघटना बदलली तर राष्ट्र कोलमडेल

देशातील अठरापगड जातधर्माचे १४० कोटी लोक राज्यघटनेमुळे एकत्र नांदत असून देश एकसंघ आहे. भारतीय राज्यघटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *