Breaking News

अॅड आशिष शेलार यांचे प्रत्युत्तर,…त्यांच्या प्रतिक्रियेला फार महत्व देत नाही घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातील प्रतिक्रिया देणार

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयानंतर राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेचे कौतुक करत भाजपाचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. दरम्यान, राज ठाकरेंच्या या टीकेला आता भाजपाचे आमदार अॅड आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.

अॅड आशिष शेलार म्हणाले, घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. जर कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? जालंधरमध्ये राहुल गांधीच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा प्रभाव नव्हता का? उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही भाजपाला घवघवीत यश मिळालं. मग तिथे ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव नव्हता का? यावर राज ठाकरे बोलतील का? अशी प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना अॅड आशिष शेलार म्हणाले, राज ठाकरे हे केवळ स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी प्रतिक्रिया देत असून त्यांच्या प्रतिक्रियेला आम्ही फार महत्त्व देत नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, आज अंबरनाथमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. या वेळी बोलताना कर्नाटकमधील भाजपाचा पराभव हा त्यांच्या स्वभावाचा आणि वागणुकीचा असल्याचं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. तसेच कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव दिसला असून जनतेला, लोकांना कधीही गृहीत धरू नये, हा बोध या निकालातून सर्वांनी घ्यावा. याबरोबरच कर्नाटक निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का असा प्रश्न विचारला असता राज ठाकरे म्हणाले, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून महाराष्ट्रातील निकालाबाबत लगेच सांगता येणार नाही, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

Check Also

उत्तर मध्य मुंबईतून भाजपाकडून अॅड उज्वल निकम यांना उमेदवारी

नुकतीच मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार तथा विद्यमान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *