Breaking News

मोदींचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचा मुंबई दौरा, नेमके कारण काय? राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुरक्षा विषयक सल्लागार अजित डोवल हे आज पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आले. तसेच मुंबईत आल्या आल्या त्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सर्वात आधी भेट घेतली. त्यानंतर वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पूर्वी ते मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या या दौऱ्यामुळे राज्याच्या राजकारणाबरोबरच सामाजिकस्तरावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे एखाद्या राज्याच्या दौऱ्यावर जाणारे अजित डोवल हे पहिलेच व्यक्ती आहेत. यापूर्वी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूकीपूर्वी त्यांचा असाच दौरा झाला होता. त्यावेळी डोवल यांनी तेव्हाचे राज्यपाल जगदीप धनखड यांची भेट घेवून तेथील परिस्थितीबाबत चर्चा केली होती. त्यानंतरच पश्चिम बंगालची निवडणूक अधिक रंगतदार झाली होती. परंतु मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांनी ती निवडणूक जिंकली.

मात्र राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकले. त्यानंतर शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाले. तसेच मागील दोन महिन्यात शिंदे-फडणवीस सरकारही चांगल्यापैकी स्थिरावले आहे. राज्यातील विधानसभा निवडणूकींना अवकाश असला तरी राज्यात कधीही मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणूकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदा, नगरपालिका-नगर परिषदा यांच्याही निवडणूकांचे बिगुल कधीही वाजण्याची शक्यता आहे.

त्यातच सध्या गणेशोत्सव राज्यात साजरा होत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे ही मुंबईत उद्या ५ तारखेला येत आहेत. असे असताना आज अचानक सुरक्षा विषयक सल्लागार अजित डोवल हे आले आहेत. त्यामुळे त्यांच्या भेटीबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लढविण्यात येत आहेत.

याचबरोबर अजित डोवल यांनी राज्यातील प्रमुख पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच या बैठकीत सुरक्षा विषयक गोष्टींचा आढावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी २६/११ च्या धर्तीवर मुंबईवर पुन्हा दहशतवादी हल्ले होणार असल्याचा व्हॉट्सअॅप मेसेज पाकिस्तानी नंबरवरून मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या नंबरवर आला होता. त्यानंतर पोलिसांनी सतर्क होत जलदगतीने तपास सुरु केला. तसेच विरार येथून एकाला अटकही केली. तसेच पुढील तपास सुरु आहे. यापार्श्वभूमीवर अजित डोवाल यांची बैठक महत्वाची मानली जात आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *