Breaking News

अजित पवार म्हणाले; …एकदम ओक्केच झालं, आता काय बोलायचं श्रीगोंद्यात एकनाथ शिंदेच्या बंडखोरीवरून केले वक्तव्य

राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे त्यांच्या मिश्किल आणि हजरजबाबी वृत्तीमुळे नेहमीच चर्चेत असतात. परिस्थिती कोणतीही असो त्यावर परखडपणे भाष्य करण्यात त्यांचा हात कोणी पकडू शकत नाही. तसेच परिस्थितीच्या अनुषंगाने वास्तवादी चित्र मांडत हास्यविनोद करण्यातही त्यांचा हातखंडा आहे. अनेकदा भाषणात किंवा माध्यमांसमोर त्यांनी लगावलेले टोले किंवा दिलेल्या कानपिचक्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. आज नियोजित कार्यक्रमानिमित्त नगरमधील श्रीगोंद्यात असणारे अजित पवार यांनी थेट व्यासपीठावरून बोलतानाच ‘एकदम ओक्के’ म्हणत एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचा उल्लेख केला आणि उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतील तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटाला जाऊन मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाले. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नगरच्या श्रीगोंद्यात बोलताना त्यावर टोलेबाजी करताना ते म्हणाले, हल्ली राजकारणात कधी काय घडेल, काही सांगता येत नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून जायलाच नको. २० जूनपर्यंत आम्ही सगळे एकत्र होतो. काय एका दिवशी त्यांच्या मनात आलं आणि गेले १५ लोकं घेऊन. काय आता तुम्ही.. हे एकदम ओक्केच झालं.. काय आता बोलायचं? अशी खोचक टिप्पणी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी भाजपा आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठींवर देखील उपहासात्मक प्रतिक्रिया दिली. याआधी गणेशोत्सव वर्षानुवर्ष चालत आले आहेत. पण कधीही मागच्या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुणी गणपतीच्या दर्शनाला कुणाच्या घरी गेले नाहीत. आम्हीही अनेक ठिकाणी दर्शनाला जातो. पण आम्ही त्यांच्यासारखे कॅमेरे बरोबर घेऊन जात नाही. पण आता प्रवेश करताना कॅमेरा लावला जातो. मग बरोबर गाडी थांबते, कुणीतरी उतरतं. ते आत जातात. नमस्कार करतात. कशाला?, असा सवालही त्यांनी केला.

जो गणेशभक्त आहे, त्याने अशा पद्धतीने देखावा करण्याचं कारण नाही. तुम्ही तुमच्या मनात ठेवा ना. पण आता काहींना शो करण्याचीच सवय आहे. राज कपूर पूर्वी शोमॅन म्हणून ओळखला जायचा. तशी सवय काहींना आता लागली आहे. जनतेनंच बघावं काय चाललंय आणि काय नाही असेही ते म्हणाले.

Check Also

वंचितच्या भूमिकेवर नाना पटोले म्हणाले, आंबेडकरांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसचे एक पाऊल पुढे

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नाही, त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *