Breaking News

शरद पवारांचे राज ठाकरेंना मुद्देसुद प्रत्युत्तर, मी तुमच्यासारखे धर्माचे प्रदर्शन करत नाही माझ्यापुढे प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श;आम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो मात्र कुटुंबातील वाचतात असं नसावं...

मला नास्तिक म्हणता परंतु मी तुमच्यासारखे देव धर्माचे प्रदर्शन कुठे करत नाही. मी १३-१४ वेळा निवडणूकीचा नारळ कुठे फोडतो ते बारामतीकरांना जाऊन विचारा…एकच ठिकाण आहे… एकच मंदिर आहे. त्याचा आम्ही गाजावाजा करत नाही. माझ्यापुढे प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे. प्रबोधनकारांनी देव धर्माच्या नावाने बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर सडकून टिका केली. गैरफायदा घेणार्‍याला ठोकून काढण्याचे काम केले आम्ही सगळे प्रबोधनकार वाचतो. मात्र कुटुंबातील वाचतात असं नसावं असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
राज ठाकरे यांनी काल ठाण्यात शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले. राज ठाकरेंच्या या आरोपाला शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलताना ‘टोले’ जंग उत्तरे दिली.
एखादी व्यक्ती वर्ष – सहा महिन्यात एखादे वक्तव्य करत असेल तर ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. पण पत्रकार विचारत आहेत, म्हणून त्यावर मत व्यक्त करतोय असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मी नाव घेत नाही, असा उल्लेख त्यांनी केला. पण दोनच दिवसापुर्वी मी अमरावतीत होतो. त्याठिकाणचे माझे संपुर्ण भाषण ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांच्या योगदानावर जवळपास २५ मिनिटे बोललो. अर्थात मला रोज सकाळी लवकर उठून वृत्तपत्र वाचनाची सवय आहे. त्यासाठी मला लवकर उठावं लागतं असा उपरोधिक टोला राज ठाकरे यांना लगावत खुपदा वृत्तपत्रात काय काय लिहिलंय हे न वाचता एखादा वक्तव्य करत असेल तर त्याला दोष देणार नाही असा खोचक टीकाही त्यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता केली.
फुले-शाहू-आंबेडकरांबाबतही उल्लेख केला जातो त्याचा अभिमान आहे मला असे सांगतानाच दुसरी गोष्ट त्यांना माहिती असली पाहिजे की, या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले काव्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी रचले होते. या तिघांचा उल्लेख करणे म्हणजे शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्यासारखे आहे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुरंदरे बद्दल मी बोललो मी लपवून ठेवत नाही. पुरंदरे यांनी शिवछत्रपतींचा उल्लेख करत असताना माँ जिजाऊंनी छत्रपतींचे व्यक्तिमत्व घडवले असे सांगण्याऐवजी दादोजी कोंडदेव यांनी ते घडविले असा उल्लेख केला होता. त्याला माझा सक्त विरोध होता. शिवछत्रपतींना घडविण्यामध्ये जिजाऊंचाच हात होता. परंतु पुरंदरेंनी ते वेगळीकडे नेण्याचा प्रयत्न केला तो योग्य नव्हता असं माझं मत तेव्हाही होतं ते आजही कायम असल्याचेही त्यांनी सांगितले.
जेम्स लेन यांनी जे काही लिखाण केले त्या लिखाणाचा आधार त्यांनी पुरंदरेकडून घेतला होता, अशी माहिती जेम्स लेनने दिली होती. एखादा लेखक जर असे वक्तव्य करत असेल त्यावर पुरंदरे यांनी कधी खुलासा केला नाही म्हणून मी जी टिका टिप्पणी केली असेन तर त्याचे मला दु:ख वाटत नाही उलट मला अभिमान वाटतो अशा शब्दात पुरंदरेंवरील टिकेचे समर्थनही त्यांनी केले.
आज खऱ्या अर्थाने महागाई, दरवाढ, बेरोजगारी हे जिव्हाळ्याचे प्रश्न होते. ज्यांनी एवढं मोठं काल भाषण केले त्यांनी सामान्य जनतेच्या सुखदुःखाच्या प्रश्नाचा साधा उल्लेखही केला नाही असा उपरोधिक टोला राज ठाकरेंना लगावत सोनिया गांधी आणि माझ्याबद्दल त्यांनी वक्तव्य केले. याबाबतीत माझे जाहीर मत आधीपासूनच स्पष्ट होते. सोनिया गांधी यांनी जेव्हा मी पंतप्रधान पदावर जाऊ इच्छित नाही, असे जाहीर वक्तव्य केल्यानंतर तो प्रश्न तिथेच संपला होता. आमची चर्चा त्यांच्या पंतप्रधानपदाबाबत होता, तो विषय निकाली लागल्यानंतर त्यावर चर्चा करण्याचे कारण नव्हते. त्यामुळे काँग्रेससोबत आम्ही तेव्हा गेलो आणि आजही त्यांच्यासोबत आहोत. मात्र त्याकाळात जे काही घडले, त्याचे सविस्तर वाचन केले असते तर कदाचित अशाप्रकारचे उद्गार राज ठाकरे यांनी केले नसते अशा कानपिचक्याही त्यांनी दिल्या.
आमचा संपणारा पक्ष नसून संपवणारा पक्ष आहे, असे ते म्हणतात ते खरे आहे. संपवणारा पक्ष याची नोंद महाराष्ट्रातील मतदारांनी योग्य घेतली व खरे दाखवून दिले की, त्यांचा एकच आमदार निवडून आलेला आहे. त्यांच्या सभा मोठ्या होतात सभेला लोक जातात. त्या सभेत शिवराळ भाषा असो की नकला यातून मात्र लोकांची करमणूक होते असा खोचक टीका त्यांनी यावेळी केली.
राज्यातील सामाजिक ऐक्याला धक्का लावण्याचा प्रयत्न होतोय. सांप्रदायिक विचारांची मांडणी काही लोक जाणीवपूर्वक करत आहेत. लोकांनी याला बळी पडू नये असे आवाहनही शरद पवार यांनी करत ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार याबाबत गंभीरतेने विचार करेल असे स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *