Breaking News

मुख्यमंत्र्याची मंत्रालयातील विभागांना सरप्राईज भेटः मंत्रालयीन कर्मचारी सुखावले अनेक विभागांना दिल्या भेटी

कोरोना काळापासून आणि त्यानंतर त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे राज्याचे मुख्यमंत्री मंत्रालयात येत नाहीत म्हणून त्यांच्यावर नेहमीच टीका केली जात आहे. मात्र आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज अचानक मंत्रालयातील पहिल्या मजल्यावरील महसूल विभागासह पाचव्या मजल्यावलरील जवळपास सर्वच विभागांना अचानक भेटी देत मंत्रालयीन कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना सुखद धक्का बसला आणि ते सुखावले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या या सरप्राईज व्हिजिट वेळी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मिलिंद नार्वेकर यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालयातील अन्य अधिकारी उपस्थित होते.
सर्वसाधारण मंत्रालयातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना भेट मुख्यमंत्री इतर कारणास्तव कधी भेटल्याचे ऐकिवात नाही. जर भेट झाली तर ती फक्त एखाद्या कार्यक्रमातच होते. मात्र प्रत्येक कर्मचाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या बसण्याच्या जागेवर जावून ख्याली खुशाली कधी जावून घेतली नाही. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या प्रथेला पहिल्यांदाच फाटा देत थेट कर्मचारी व अधिकाऱ्यांची भेट त्यांची ख्याली खुशाली विचारत असल्याचे चित्र मंत्रालयाच्या प्रत्येक विभागात पाह्यला मिळाले.
त्याचबरोबर मंत्रालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री ठाकरे हे स्वतः बोलून त्यांच्या विभागाच्या कामकाजाविषयी चर्चा करत होते. तसेच फाईलींच्या दिसणाऱ्या ढीगांबाबत माहितीही जाणून घेतली. पहिल्या मजल्यावरील महसूल विभागात काही ठिकाणी फाईलींचा ढीग पाहिला असता या फाईली कधी बाजूला होणार असा सवाल उपस्थित कर्मचाऱ्यांना केला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले अवर सचिव श्रीकृष्ण पवार यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती देताना सांगितले की, या सर्व फाईली या सरकारी जमिन वाटपाशी निगडीत आणि सुनावणीच्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर निकाल झाल्यानंतर त्या हटविण्यात येतात. तसेच त्यावर झालेल्या निकालांच्या प्रतींचे आपल्याकडे रेकॉर्ड ठेवले जात असल्याची बाब मुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून दिली.
तर कक्ष अधिकारी विक्रम निकम यांच्याशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वतः बोलत त्याच्या डेस्कला सुरु असलेल्या कामकाजाबद्दल विचारणा केली. तसेच कामाच्या अनुषंगाने काही अडचण तर नाही ना अशी विचारणाही केली.
गतिमान कार्यभार करतांना अधिकाधिक पेपरलेस काम आणि तंत्रज्ञानाचा उपयोग कसा वाढेल ते पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातल्या काही विभागांना आज स्वतः: भेटी दिल्या तसेच कर्मचाऱ्यांशी चर्चा करून ई टपाल, पेपरलेस कामकाज प्रणाली विषयी सूचना केल्या व अडचणी विचारल्या. यावेळी कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करतांना एका दिव्यांग कर्मचाऱ्याची त्यांच्यासमवेत छायाचित्र घेण्याची इच्छाही पूर्ण केली आणि त्याची विचारपूसही केली. अशा प्रकारे थेट विभागांना भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांशी बोलणारे मुख्यमंत्री विरळाच अशी प्रतिक्रियाही अनेकांनी व्यक्त केली. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुलं वाहून अभिवादन केले
बाबासाहेबांवरील प्रदर्शन कायमस्वरूपी हवे
यावेळी पुराभिलेख संचालनालय यांच्यातर्फे मंत्रालय त्रिमूर्ती प्रांगणात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर एक सुंदर प्रदर्शन लावण्यात येत आहे, त्यांच्या तयारीची पाहणी मुख्यमंत्र्यांनीकेली. हे प्रदर्शन कायमस्वरूपी इंदू मिल येथील स्मारकस्थळी पण लावा अशी सूचना करून मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शनातील बाबासाहेबांचा दस्तावेज तसेच पत्रं, जुनी छायाचित्रे यांची उत्सुकतेने पाहणी केली व सूचनाही केल्या. यावेळी त्यांच्या समवेत मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, अतिरिक्त मुख्य सचिव साप्रवि डॉ संजय चहांदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस आयुक्त संजय पांडे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
कर्मचाऱ्यांशी थेट चर्चा
त्रिमूर्ती प्रांगणातील प्रदर्शनाची तयारी पाहून मुख्यमंत्री प्रथम मंत्रालयातील विस्तारित इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सामाजिक न्याय विभागाच्या कर्मचाऱ्यांना भेटले. त्याठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त केलेल्या सजावटीचे त्यांनी कौतुक केले तसेच बाबासाहेबांच्या प्रतिमेचेही पूजन केले. कर्मचाऱ्यांशी बोलून त्यांच्या कमाविषयीही त्यांनी माहिती घेतली.
यानंतर मुख्यमंत्री महसूल विभाग तसेच सामान्य प्रशासन विभाग, गृह विभाग, विधी व न्याय अशा विभागात प्रत्यक्ष आतमधून फिरले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी मुख्य सचिवांनी मंत्रालयात ६ एप्रिलपासून फाईल्स आणि कागदपत्रे यांचे संगणकीकरण तसेच स्वच्छता, अनावश्यक कागदपत्रांची विल्हेवाट याची मोहीम सुरु असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी देखील पेपरलेस कामांवर भर देताना तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त उपयोग करावा अशा सूचनाही केल्या. मुख्यमंत्र्यांनी संकल्प कक्ष तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील कक्षांना देखील भेट देऊन पाहणी केली व कामकाजाविषयी महत्वपूर्ण सूचना केल्या
कर्मचाऱ्यांची आस्थेवाईकपणे चौकशी
मंत्रालयातील कर्मचाऱयांनीही आपल्या भेटीस आलेल्या मुख्यमंत्र्यांची तब्येतीची विचारपूस केली. मुख्यमंत्र्यांनी दाखविलेल्या आपलेपणामुळे व प्रत्यक्ष कामकाजाविषयी केलेल्या सुचनांमुळे उत्साह दुणावल्याची प्रतिक्रीया गृह विभागातील कर्मचारीअश्विनी राम धावणे यांनी दिली. याच विभागातील प्रगती विकास मोरे यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी, ‘कशा काय बऱ्या आहात ना?’ अशा शब्दांत विचारपूस केली. विधि व न्याय विभागातील सहायक कक्ष अधिकारी प्रियंका गावडे व त्यांच्या सहकारी म्हणाल्या, आमच्या विभागाला भेट देणारे मुख्यमंत्री ठाकरे पहिलेच मुख्यमंत्री असावेत. त्यांनी अगदी साधेपणाने विचारपूस केली. कामाची चौकशी केली. त्यांच्या भेटीने आम्हाचाही उत्साह वाढला आहे. त्यांनी पहिल्याच वर्षी जागतिक महिला दिन- ८ मार्च रोजी आम्हा सर्वांना आपुलकीने पत्र आणि फुल देऊन आश्चर्यचकीत केले होते. त्यांची आजची भेटही अशीच आश्चर्यचकीत करणारी आहे.
सामान्य प्रशासन विभागाच्या मुख्यमंत्री व मंत्री आस्थापनेच्या कक्ष अधिकारी श्रीमती कल्याणी धारप व संगीत गुल्हाने म्हणाल्या, मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या विभागाला भेट देणे ही गोष्ट छान वाटली. त्यांनी आमच्याकडच्या लेजर बुक्स पाहून त्याविषयी बारकाईने जाणून घेतले.

विभागवार भेटीत कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना मुख्यमंत्री यांची काही क्षणचित्रेः-

Check Also

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *