Breaking News

विधानसभेत नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून विरोधकांककडून गोंधळ गोंधळातच शासकीय कामकाज उरकले

जमिनीची खरेदी अंडरवर्ल्डशी संबधित असलेल्या व्यक्तींकडून केल्याप्रकरणी आणि मनी लॉंडरींग प्रकरणी ईडीने अटक केलेले राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत भाजपाच्या सदस्यांनी गदारोळ घातला. त्यामुळे गोंधळात सरकारला कामकाज पुढे रेटावे लागले.
दाऊद इब्राहीमशी संबंध असल्याच्या आरोपावरून नवाब मलिक यांना अटक झाली आहे. तरी त्यांचा राजीनामा घेतला नाही. राज्याच्या इतिहासात असे कधीही घडले नव्हते, असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच नियम ५७ अन्वये स्थगन प्रस्ताव देत सभागृहासमोरील सर्व कामकाज बाजूला सारून या विषयावर चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दाऊदचे समर्थन करणाऱ्या मंत्र्याचा राजीनामा घ्या. हसीना पारकर या दाऊदच्या बहिणीशी व्यवहार करून नवाब मलिक यांनी दहशवाद्यांना मदत केली आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी एक मिनिट मलिकांना पदावर राहू दिले नसते असा दावा फडणवीस यांनी केला.
विरोधी पक्ष नेत्यांनी आपले म्हणणे मांडल्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी विरोधी पक्षाचा प्रस्ताव फेटाळून लावला.
यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच झिरवळ यांनी पुढील कामकाज पुकारले. वित्तमंत्री अजित पवार यांनी सभागृहात ६ हजार २५० कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. राज्यपालांनी संमत केलेल्या विधेयकांची यादी सभागृहात वाचून दाखवली. त्यानंतर झिरवळ यांनी शोक प्रस्ताव पुकारला.
स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर, उद्योजक राहुल बजाज यासह दिवंगत सदस्य एन. डी. पाटील, गजानन बाबर, नरेंद्रसिंग पाडवी, विश्वासराव पाटील, आशाताई टाले यांच्या निधनाबद्दल भावना व्यक्त करीत झिरवाळ यांनी सभगृहाच्यावतीने आदरांजली वाहिली. यानंतर सभगृहाची बैठक दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *