Breaking News

रिलायन्समध्ये नेतृत्वबदलाचे मुकेश अंबानीं यांचे संकेत अंबानी कुटुंबियांच्या तिसऱ्या पिढीकडे वर्ग होणार जबाबदारी

मराठी ई-बातम्या टीम

देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि सर्वात श्रीमंत उद्योगसमूहांपैकी एक असलेले मुकेश अंबानी आणि रिलायन्समध्ये आता मोठा नेतृत्वबदल होण्याची शक्यता आहे. खुद्द रिलायन्स समूहाचे सीएमडी मुकेश अंबानी यांनी त्यासंदर्भात सूतोवाच केले आहेत. रिलायन्स फॅमिली डेच्या निमित्ताने मुकेश अंबानी यांनी रिलायन्स समूहातील सर्व अधिकारी-कर्मचारी आणि भागधारकांशी संवाद साधला. यावेळी मुकेश अंबानी यांनी भविष्यात रिलायन्सची वाटचाल कशा पद्धतीने होईल, याविषयी भाष्य केलं. यावेळीच बोलताना मुकेश अंबानी यांनी रिलायन्समध्ये मोठे नेतृत्वबदल होणार असल्याचं भाष्य केलं आहे. त्यामुळे आता अंबानी कुटुंबाची तिसरी पिढी उद्योगविश्वात रिलायन्सचं नाव मोठं करण्यासाठी टेकओव्हर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, रिलायन्स फॅमिली डेच्या दिवशी अर्थात मंगळवारी २८ डिसेंबर रोजी मुकेश अंबानी यांनी आपल्या भाषणामध्ये याचा उल्लेख केला आहे. रिलायन्स सध्या या प्रक्रियेमधून जात असून आकाश अंबानी, इशा अंबानी आणि अनंत अंबानी या उद्योगाला नव्या उंचीवर नेतील असं देखील विधान मुकेश अंबानी यांनी केलं आहे.

“मोठी स्वप्न आणि अशक्य वाटणारी ध्येयं पूर्ण करण्यासाठी योग्य व्यक्ती आणि योग्य नेतृत्व असणं आवश्यक असतं. रिलायन्स सध्या अशाच प्रकारच्या मोठ्या नेतृत्वबदलाच्या प्रक्रियेमध्ये आहे. हा बदल माझ्या पिढीच्या ज्येष्ठांकडून पुढच्या पिढीच्या तरुण नेतृत्वाकडे होईल”, असं मुकेश अंबानी म्हणाले.

मुकेश अंबानी यांची तिन्ही मुले, आकाश अंबानी, इशा अंबानी आणि अनंत अंबानी हे आधीच ग्रुप कंपनींच्या संचालक मंडळावर आहेत. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मुकेश अंबानी म्हणाले, “पुढच्या पिढीचं नेतृत्व म्हणून आकाश, इशा आणि अनंत रिलायन्सला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जातील याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही”.

इशा अंबानी आणि आकाश अंबानी हे सध्या रिलायन्स जिओ आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या डिजीटल विंगच्या संचालक मंडळावर आहेत. तर अनंत अंबानी हा रिलायन्स न्यू सोलर एनर्जीचा संचालक आहे. मात्र, अजून हे तिघेही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या मुख्य कंपनीच्या संचालक मंडळावर नाहीत.

अंबानी पुढे म्हणाले, लाखो लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याची आणि देशाच्या विकासाला हातभार लावण्याची माझ्या वडिलांमध्ये दिसणारी जिद्द आणि कर्तबगारी पुढच्या पिढीमध्ये मला दिसतेय. रिलायन्सला अजून जास्त यशस्वी करण्यासाठी आपण सर्व मिळून त्यांना शुभेच्छा देऊयात. माझ्यासह सर्व ज्येष्ठांनी आता रिलायन्समधल्या तरुण नेतृत्वाला तयार करण्यासाठी झोकून दिलं पाहिजे. आपण त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्यांच्या कामाला बळ दिलं पाहिजे”.

Check Also

आता विमा विस्तार १५०० रुपयात, आयआरडिएआयचा विचार एजंटाना १० टक्के कमिशन देण्याची योजना

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अर्थात आयआरडिएआय IRDAI ने शुक्रवारी येथे संपन्न झालेल्या दोन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *