Breaking News

शरद पवारांचे ते वक्तव्य आणि राज्यपालांच्या भूमिकेवरून अजित पवार म्हणाले… मला वाटेल त्यावेळी मी बोलेन पण आम्ही राज्यपालांना समजावून सांगू

मराठी ई-बातम्या टीम

विधानसभेच्या रिक्त अध्यक्षपदाच्या निवडणूकीवरून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर आधीच राज्यातील वातावरण तापलेले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चर्चा झाल्याचे सांगत फडणवीसांबरोबरील त्या औट घटकेच्या सरकार मागे आपण नसल्याचे काल स्पष्ट केले. त्यानंतर यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काय बोलतात याकडे उत्सुकता लागलेली निर्माण झाली.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता प्रसारमाध्यमांच्या प्रश्नावर त्रागा व्यक्त करत म्हणाले की, मी यापूर्वीच सांगितले आहे. त्या घटनेबाबत मला जेव्हा वाटेल त्यावेळी मी बोलेन तो अधिकार माझा असल्याचे सांगत त्या औट घटकेच्या सरकारबाबत अधिक बोलण्याचे टाळले.

पुण्यामध्ये एका कार्यक्रमानंतर ते बोलत होते.

त्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीवर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नियमात केलेली दुरूस्तीच घटनाबाह्य असल्याचे सांगत त्याविषयीची प्रक्रिया सुरु करण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष पुन्हा निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, आमच्याकडे बहुमत असतानाही आम्ही टोकाची भूमिका घेवून अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष पदाची निवडणूक घेतली असती. पण आम्ही ती घेतली नाही. परंतु, पुढील अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे राज्य सरकारने आधीच जाहीर केले आहे. मात्र, त्याआधी घटनातज्ज्ञाशी देखील चर्चा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपालांच्या मुद्द्यावर मी सविस्तर बोललो आहे. त्यांनी घटनात्मक बाबी उपस्थित केल्या आहेत. आम्ही बहुमत असूनही त्यावर टोकाची भूमिका न घेता अध्यक्षपदाची निवडणूक त्या दिवशी घेतली नाही. आम्हाला त्या दिवशी निवडणूक घेता येत होती. पण आम्हाला राज्यपालांचा अनादर करायचा नाही. ते महत्त्वाचं पद आहे. त्यांचा आपण आदर केला पाहिजे. सन्मान केला पाहिजे असेही ते म्हणाले.

दरम्यान, राज्यपालांची आम्ही पुन्हा भेट घेणार असल्याचे सांगत आम्ही प्रमुख लोक पुन्हा जाऊन राज्यपालांना भेटू, त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. घटनातज्ज्ञांचाही सल्ला घेऊ. आता दोन महिने हातात असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल महोदयांनी सांगूनही निवडणूक घेतली असती, तर असमजूतदारपणा.. पण आता काही जणांना बोलताना कळतच नाही की समजूतदार पणा काय आणि असमजूतदारपणा काय..आम्ही पुन्हा राज्यपालांना भेटून सांगू. त्यात काय घटनाबाह्य आहे ते आम्हीही समजून घेऊ. त्यांना जे सांगायचंय ते आम्हीही सांगू. त्यांनीही माहिती घ्यावी, आम्हीही घेऊ..आम्हाला त्यांचा आदर ठेवूनच राज्य चालवायचं असल्याचे सांगत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

Check Also

आणि वडेट्टीवारांनी उडविली पडळकरांची खिल्ली, “नया नया पंछी ज्यादा फडफड…” वडेट्टीवार पडळकरांचा ओबीसीवरून नवा वाद

मराठी ई-बातम्या टीम ओबीसी आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयात उद्या सोमवारी सुणावनी असून या पार्श्वभूमीवर ओसीबी समाजाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *