Breaking News

गायब अनिल देशमुखांबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट करावी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी
महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत, प्रगत राज्याचा माजी गृहमंत्री अनेक महिन्यांपासून गायब आहे. महाराष्ट्राला ही गोष्ट भूषणावह नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गायब होण्याबाबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खुलासा करावा, अशी मागणी भा जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते.
अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देताना सांगितले होते की , आपण सीबीआय , ईडी कडून होणाऱ्या चौकशीला सर्व प्रकारचे साह्य करू. मात्र राजीनामा दिल्यानंतर देशमुख यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. आपल्याला अटक होऊ नये यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर देशमुख यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही देशमुख यांचा युक्तीवाद अमान्य केला आहे. आता देशमुख हे गायब झाले आहेत. अनिल देशमुख हे का गायब आहेत, ते जनतेसमोर तपास यंत्रणांसमोर का येत नाहीत याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने करावा, असा आग्रह त्यांनी यावेळी धरला.
यावेळी मुख्यमंत्र्यांवरही उपाध्ये यांनी जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांनी धार्मिक व राजकीय कार्यक्रम थांबविले पाहिजेत अशा आशयाचे वक्तव्य केले आहे. मात्र गणेशोत्सवासारखा सण तोंडावर आल्यावरच मुख्यमंत्र्यांना अशी वक्तव्ये का करावीशी वाटतात याचे आश्चर्य वाटते. मंदिरे, चित्रपटगृहे वगळता राज्यात सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत. फक्त मंदिरांत जाण्याने कोरोना पसरतो का याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *