Breaking News

“त्या” युवकांचे ऑलिंपिकच्या धर्तीवर राज्य शासनामार्फत रोख पुरस्कार देऊन गौरव करणार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी

शांघाय येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेच्या पूर्वतयारीसाठी राज्यात आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचा आज कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या स्पर्धेत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील २६३ युवक-युवतींनी सहभाग घेतला होता. त्यातील १३२ युवक-युवतींना सुवर्ण, रजत आणि कांस्य पदकाद्वारे मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

सुवर्णपदक विजेत्यासाठी दहा हजार रुपये, रजत पदक विजेत्यासाठी सात हजार रुपये तर कांस्य पदक विजेत्यासाठी पाच हजार रुपये पुरस्कार रक्कमही देण्यात आली. आता गांधीनगर येथे होणाऱ्या झोनल स्पर्धेत आणि त्यानंतर बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी या युवक-युवतींना मिळणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील विजेते स्पर्धक पुढील वर्षी शांघाय (चीन) येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग घेऊ शकतील.

शांघाय स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या युवक-युवतींना ऑलिंपिक स्पर्धांच्या धर्तीवर राज्य शासनामार्फत रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल, असे मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी जाहीर केले. राज्यस्तरीय स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांची संपूर्ण तयारी कौशल्य विकास विभागामार्फत करून घेण्यात येईल. त्यांना राज्य शासनामार्फत जागतिक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने संपूर्ण पाठबळ देण्यात येईल, असे मंत्री श्री. मलिक म्हणाले. महाराष्ट्रातील युवक-युवतीमध्ये चांगले टॅलेंट आहे. कौशल्यातील टॅलेंट शोधण्यासाठी आयटीआयबरोबरच विविध उद्योग, पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालय आदी ठिकाणी शोध घेऊन टॅलेंट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यात येईल, असे ते म्हणाले.

स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी थ्रीडी डिजिटल गेम आर्ट, ऑटो बॉडी रिपेअर, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बेकरी, ब्युटी थेरपी, कारपेंटिंग, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सीएनसी मिलींग, काँक्रीट कंस्ट्रक्शन वर्क, कुकिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन टेक्नॉलॉजी, हेअर ड्रेसिंग, होटेल रिसेप्शन, हेल्थ अँड सोशल केअर अशा विविध क्षेत्रातील कल्पक अशा कौशल्यांचे सादरीकरण केले.

परळ येथील आयएसएमई स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड इंटरप्रेनर्शिप येथे झालेल्या या कार्यक्रमास कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह, रुस्तमजी ग्रुपचे अध्यक्ष बोमन रुस्तम इराणी, डॉ. इंदू सहानी, वर्ल्ड स्किलचे कंट्री हेड प्रकाश शर्मा, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाचे सीनियर हेड जयकांत सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.

बांधकाम क्षेत्रातील कौशल्यात चमकदार कामगिरी दाखविणाऱ्या २ विद्यार्थ्यांची जबाबदारी तथा स्पॉन्सरशिप आपण स्वीकारीत आहोत, असे बोमन रुस्तम इराणी यांनी यावेळी जाहीर केले.

कौशल्य विभागाकडून अशा पध्दतीच्या स्पर्धेत विजयी होणाऱ्या युवकांचा पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा रोख पुरस्कार देवून गौरव करण्यात आला आहे. तसेच शांघाय येथे आयोजित जागतिक स्पर्धेतही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युवकांना ऑलंपिकच्याधर्तीवर राज्य सरकारकडून रोख पुरस्कार देवून सन्मान करणार असल्याचे मंत्री मलिक यांनी जाहीर केल्याने या क्षेत्रात नवनवे उद्योजक निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर महाराष्ट्राची मान आणखी उंच होवून राज्याच्या सन्मानात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *