Breaking News

राज्यातील शैक्षणिक क्षेत्र खाजगी कंपन्यांना खुले स्वयंअर्थसहाय्यित शाळा सुधारीत विधेयक विधानसभेत मंजूर

नागपूर: प्रतिनिधी

केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणानुसार कार्पोरेट क्षेत्रातील किंवा खाजगी कंपन्यांना त्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सोशल रिस्पॉन्सबिलीटी फंड) खर्च करण्यासाठी शाळा स्थापन करण्याची मुभा राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या खाजगी कंपन्यांना शैक्षणिक संस्था सुरु करणे सोयीचे व्हावे यासाठी स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) या कायद्यात सुधारणा करण्यास विधानसभेने मान्यता दिली.

कायद्यातील या सुधारणेमुळे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेल्या सामाजिक संस्थाबरोबरच खाजगी कंपन्यांनाही आता शैक्षणिक संस्था सुरु करता येणे शक्य होणार आहे. तसेच या शाळांना या कायद्यातील सर्व तरतूदी लागू होणार असून या शाळांमधून दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची पालकांची कोणतीही अडचण या शाळांकडून होणार नसल्याची काळजी राज्य सरकारकडून घेण्यात येणार असल्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी दिले.

या सुधारीत विधेयकावर काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, पंडीत सकपाळ, सुनिल केदारे, राष्ट्रवादीचे अजित पवार, शशिकांत शिंदे, शिवसेनेचे सुभाष साबणे, भाजपचे चैनसुख संचेती, राज पुरोहीत यांच्यासह अनेक सदस्यांनी या विधेयकावर आपल्या सुचना मांडल्या.

या कायद्यान्वये खाजगी कंपन्यांना शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही शाळा सुरु करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक शाळेला मान्यता देताना त्या शाळेला स्वत:चे किंवा भाडेतत्वावरील क्रिडांगण आहे की नाही याची खात्री करूनच मान्यता देण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण असलेले शिक्षण मिळावे यासाठीच हा निर्णय घेतला असल्याचे समर्थनही मंत्री तावडे यांनी यावेळी केले. विधेयकावरील बाजू मांडल्यानंतर अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी हे विधेयक बहुमताने मंजूर केले.

सरकारच्या मालकीच्या आंतरराष्ट्रीय शाळा सुरु करणार

राज्यात काही संस्थाकडून आंतरराष्ट्रीय शाळा, कॉलेज सुरु करण्याविषयीचे प्रस्ताव येत आहेत. त्याधर्तीवर राज्यातील विद्यार्थ्यांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी सरकारकडून आंतरराष्ट्रीय शाळा सुरु करण्यात येणार असून त्यासाठी एसएससी बोर्डाच्या धर्तीवर लवकरच नवे आंतरराष्ट्रीय बोर्डही स्थापन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्यात १०० शाळा सुरु करणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली.  

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *