Breaking News

ऊस वजन काट्यात बनवाबनवी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करणार सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची घोषणा

नागपूर: प्रतिनिधी

राज्यातील काही साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करताना वजन काट्यात बनवाबनवी करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात सदर कारखान्याच्या वजन काट्याच्या ठिकाणी भरारी पथकाकडून छापे मारून कारखान्याच्या संचालकांवर कारवाई करणार असल्याची घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली.

शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करताना काही साखर कारखान्यांकडून त्याच्या वजनात काटा मारला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा विदर्भातील लक्षवेधीवरील चर्चेच्यावेळी आमदार बच्चु कडू यांनी विधानसभेत उपप्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित केला. यावेळी दिलीप वळसे-पाटील, विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेकांनी चर्चेत भाग घेतला. त्यावर उत्तर देताना मंत्री देशमुख यांनी वरील घोषणा केली.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी सर्व साखर कारखान्यांसाठी वाहतूकीचा खर्च आणि ऊस तोडणीचा एकच दर निश्चित करावा अशी मागणी करत आयात शुल्कात वाढ करावी अशी मागणी केली.

त्यावर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी याप्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार असून त्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी भाजपचे एकनाथ खडसे यांनीही ऊस खरेदी संदर्भात वाहतूकीचे दर ठरविण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेले प्रसिध्द पत्रक आजच रद्द करावे अशी मागणी केली. राज्य सरकारच्या चुकीच्या साखर धोरणामुळे साखर कारखानदारी डबघाईला आली असून पुढच्या वर्षापासून कारखाने बंद करायची पाळी आल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्र्याच्या उपस्थित होणाऱ्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सहकार मंत्री देशमुख यांनी दिली.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *