Breaking News

महार बटालियन आणि शौर्याचा इतिहास सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा खास लेख

आताच्या नवबौध्द आणि पूर्वाश्रमीच्या महार जातीच्या पराक्रमी इतिहासाची मोठी परंपरा आहे. लढवय्या महारांना आपल्या पुर्वजांकडून मिळालेल्या अंगभूत नैसर्गिक साहसी गुणामुळे त्यांनी आपला इतिहास घडवता आला. डॉ. बाबसाहेब आंबेडकरांनी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक अशा सर्वच आघाड्यांवर प्रस्तापितांच्या अन्यायाविरोधी दिलेली कडवी झुंज याची साक्ष आहे.

स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मुलभूत तत्वांसाठी त्यांनी ब्रिटीश, आणि नंतर नवस्वतंत्र भारतातील राज्यकर्त्यांच्या विरोधाला न जुमानता अखंडपणे तीव्र संघर्ष केला. यातून महारांच्या पूर्वजांच्या शौर्य साहस आणि पराक्रमाची प्रचिती येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी शिंदे स्वतः ब्रिटीशांच्या सैन्यात सुभेदार होते. त्यांच्याकडूनच त्यांना सत्यासाठी साहसी आणि कडवी झुंज देण्याचे बाळकडू मिळाले.

महार जातीच्या सैनिकांच्या शौर्याला खऱ्या अर्थाने ओळख प्राप्त झाली, ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात. १६ व्या शतकात शिवाजी महाराजांनी इथल्या महारांमध्ये आढळणाऱ्या शौर्य, धाडस आणि चिकाटी या गुणांमुळे त्यांना स्वराज्याच्या मोठ्या आणि अतिशय महत्वाच्या पदावर नियुक्त केले. एवढेच नाही तर स्वतःचे अंगरक्षक, राज्य विस्तार आणि राज्य सुरक्षेतेतील महत्वाच्या जबाबदाऱ्या महार जातीच्या सैनिकांवर सोपवून त्यांच्या शौर्याला न्याय दिला. महार सैनिकांचा शौर्याचा आणि पराक्रमाचा फार मोठा इतिहास आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या किल्यात पहारेकऱ्याचे काम आणि गनीमी लढाई करण्यात ते तरबेज होते. शिवरायांच्या राजधानी असलेल्या रायगड किल्याचे किल्लेदार शयनाक महार होता. तसेच रोहीडा किल्याची जबाबदारी कालनाक महार व सोंडकर महार यांचेकडे होती. संभाजी राजांना बऱ्हाणपुरात घेराव झाला, तेव्हा एकटाच २५ गनीमी कापणारा शयप्पा महार आणि महाराजांच्या हत्येनंतर पेटलेल्या संग्रामात मोगलांच्या नाकात दम आणणारे नागेवाडीचे महार व मौजे वेलंगचे सिद्नाक महार होते.

सिद्नाक महार व त्यांच्या सैनिकांच्या अतुलनीय पराक्रमामुळे माधवराव पेशव्यांना खडर्याचा विजय प्राप्त करून दिला. परंतु, विजयाच्या उन्मादात त्यांनी त्याच रगांगणावर सिद्नाक व त्यांच्या सैनिकांची अवहेलना केली. इंग्रज मराठा युध्दात इंग्रजांकडून लढतानाचा इतिहास व तेव्हापासून स्वातंत्र्यानंतर देशासाठी लढताना महार रेजीमेंटने केलेले कार्य अतुलनीय आहे. ही एकमात्र अशी रेजीमेंट आहे, जिने भारताच्या सर्व समुदायाच्या क्षेत्रातील सैनिकांनी एकत्रीत करून तयार केली आहे.

इंग्रजांच्या सैन्यात असताना महार सैनिकांनी पेशवाईचा भीमा कोरेगाव येथे केलेला पराभव हा सर्वविदीन आहे. स्वातंत्र्यानंतर ही एक रेजीमेंट आहे, ज्यांनी देशाला दोन सेनाप्रमुख दिले. अनेक युध्द जिंकले व अनेक सर्वोच्च वीरता पुरस्कार प्राप्त केले आहेत. १९८१ ते १९८३ पर्यंत सेना प्रमुख राहीलेले के.व्ही.कृष्णराव किंवा १९८५ ते १९८८ पर्यंत सेना प्रमुख राहीलेले कृष्णास्वामी सुंदरजी हे महार रेजीमेंटचे होते. १९६२ च्या युध्दात महार रेजीमेंट लड्डाख मध्ये सक्रीय होते. बोलो हिन्दुस्थान की जय हा नारा देत १९७१ चे युध्द लढले. १९८७ मध्ये श्रीलंकेमध्ये इंग्रजी कार्यवाहीत त्यांचा सहभाग होता.

द्वितीय विश्वयुध्दात बर्मा अभियानात त्यांचा सहभाग होता. १८१८ च्या भीमा कोरेगांवच्या युध्दा सहीत शंभर पेक्षा अधिक वर्षापर्यंत सेवा केली.

१८९२ मध्ये महार रेजीमेंटचे विघटन करण्यात आले, व एका आंदोलनानंतर पुर्नस्थापित केले गेले. विभाजनाच्या वेळी व त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत रेजीमेंटने झालेल्या हिंसाचारात लाखो शरणार्थी यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरण करण्यास मोठी मदत केली.

आता पर्यंत झालेल्या अनेक लढायात महार रेजिमेंटचे कार्य अतुलनीय राहीले आहे.

२१ व्या आणि २७ व्या महार रेजिमेंटच्या तुकडीने १८५८ च्या युध्दात मोठा पराक्रम केल्याची नोंद आहे. १८९२ पर्यंत ब्रिटीश भारतातील सैन्यामध्ये महार बटालियनचे आपले स्वतंत्र महत्व अबाधित होते. त्यानंतर मात्र १८९२ मध्ये महार बटालियन बंद करण्यात आली. ब्रिटीश सरकारने सैन्य भरतीत नवीन धोरण स्विकारून ‘क्लास रेजिमेंट’ या नावाने नवीन भरती करणे सुरू केले. त्यामुळे महार सैनिकांची भरती बंद झाली. तत्कालिन कमांडर-इन-चिफ जनरलनी महार बटालियनला ब्रिटीश सैन्यातून बाद केले. ब्रिटीश सरकारला या धोरणामुळे बराच असंतोष आणि विरोधाचा सामना करावा लागला. दरम्यानच्या काळात महार समाजातील अनेकांनी विविध मार्गांनी आपली नाराजी व्यक्त केली. गोपाल बाबा वलंगकर यांनी १८९४ मध्ये ब्रिटीश सरकारला निवेदन देऊन महार बटालियन पू्र्ववत सुरू करून महार सैनिकांना सामावून घेण्याचा आग्रह धरला. १९०४ मध्ये शिवराम जानबा कांबळे यांनीसुद्धा महार बटालियनच्या पुर्नगठनासाठी ब्रिटीश सरकारला विनंती केली. आणि ब्रिटीश सरकारने अंगिकारलेल्या तत्कालीन सैन्य भरती धोरणाचा विरोध केला. मात्र त्याला यश आले नाही. अखेर पहिल्या महायुद्धात ब्रिटीश सैन्याची अवस्था वाईट झाल्यामुळे महार बटालियनमध्ये पुन्हा सैन्य भरतीला मंजूरी द्यावी लागली. हा महार सैन्याचा गौरवच म्हणावा लागेल.

१९१७ ला पुन्हा १११ सैनिकांची महार बटालियनच्या सैन्यात भरती करण्यात आली. तर १९२० मध्ये महार बटालियनला ७१ व्या पंजाब रेजिमेंट मध्ये सामावून घेण्यात आले. मात्र १९२१ ला पुन्हा महार बटालियन बरखास्त करण्यात आली. १८१८ च्या आधीचा एक काळ असा होता की ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या बाम्बे आर्मीमध्ये १/६ सदस्य हे महार बटालियनचे असायचे. परंतु १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि २० व्या शतकाच्या पूर्वार्धात महार बटालियनच्या संदर्भात ब्रिटीश सरकारने वेळोवेळी घेतलेल्या निर्णयामुळे महार सैनिकांच्या पराक्रमावर अन्याय झाला.

जुलै १९४१ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची व्हाईसरॉय एक्सिक्युव कॉन्सिलच्या डिफेन्स अॅडवायझरी कमिटीवर नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून पुन्हा महार बटालियनची स्थापना करण्यासाठी ब्रिटीश सरकारवर दबाव आणला. त्यामुळे अखेर १ ऑक्टोबर १९४१ मध्ये लेफ्टीनंट जनरल कर्नल जोह्नसन यांच्या १३ व्या फ्रंटियर फोर्स रायफल्सच्या तुकडीत महार रेजिमेंट बटालियनची बेळगाव, कर्नाटक येथे स्थापन करण्यात आली. तसेच महार बटालियनची दुसरी महार रेजिमेंट बटालियन लेफ्टनंट जनरल कर्नल किरवान आणि मेजर भोलाजी रांजणे यांच्या नेतृत्वात कामठी, नागपूर येथे स्थापन करण्यात आली.

महार बटालियनचे कॅप्टन मोर्टलेमांस यांनी महार रेजिमेंटच्या टोपीवरील बिल्ल्यावर ऐतिहासिक कोरेगाव भीमाच्या ‘विजय स्तंभाचे’ चिन्ह अंकित करून त्यावर ‘वर्ल्ड महार’ असे नोंदवून महार सैनिकांच्या अचाट पराक्रमाला जागृत ठेवले होते, हा इतिहास आहे.

महार बटालियनमधिल सैनिकांनी विविध विभागात पराक्रम गाजवून तत्कालिन ब्रिटीश आणि स्वतंत्र भारताच्या सैन्यामध्ये सुध्दा अनेक शौर्य विक्रम केले. त्यामुळे आजही भारतीय सैन्यात महार बटालियनचे नाव सन्मानाने घेतले जाते. महार रेजिमेंटच्या सैनिकांनी युध्दकाळात आणि शांतीकाळात आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे जगभरात किर्ती मिळविली. महार रेजिमेंटने ९ युध्दक्षेत्र सन्मान आणि १२ रणक्षेत्र सन्मान मिळविले आहेत. तसेच १ परमवीर चक्र, १ अशोक चक्र, ९ परम विशिष्ट सेना पदक, ४ महावीर चक्र, ४ किर्ती चक्र, १ पद्मश्री, ३ उत्तम युध्द सेवा पदक, १६ अतिविशिष्ट सेवा पदक, ३० वीर चक्र, ३९ शौर्य चक्र पदक, २२० सेना मेडल आणि बरेच इतर पुरस्कार मिळविलेले आहेत. याशिवाय महार रेजिमेंटने २ चिफ ऑफ आर्मी स्टाफ तसेच २ आर्मी कमांडर भारतीय सेनेला देण्याचा मान मिळविला आहे. विशेष म्हणजे या महार रेजिमेंटने २ लष्कर प्रमुख आणि ५ राज्यपाल पद भूषविणाऱ्या व्यक्ती देशाला दिल्या आहेत. महार रेजिमेंटच्या या कामगिरीमुळेच ती ऑल इंडिया ऑल क्लास रेजिमेंट बनली आहे. अशा थोर कामगिरीमुळेच शूरवीर आणि लढवय्या महारांनी भारतीय सैन्याची मान सदैव उंच ठेवली. सैन्यातील शौर्याला एका सन्मानिय उंचीवर पोहचविले. प्रचंड देशभक्ती आणि देशाच्या संरक्षणासाठी तत्परता यासाठी महार बटालियन सदैव अग्रेसर राहिलेली आहे. महार समाजात जन्म घेणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यांच्या पूर्वजांनी गाजविलेला इतिहास उजागर करून त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी नव्या पिढाला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *