Breaking News

अर्धातास आधी विद्यार्थ्यांनी परिक्षा हॉलमध्ये पोहचणे गरजेचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे नवे फर्मान

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ताण विरहीत परिक्षा देता यावी याकरीता पेपर सुरु होण्याच्या आधी अर्धातास परिक्षा हॉलमध्ये उपस्थित रहावे लागणार असल्याचे नवे तुघलकी फर्मान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काढत बसला उशीर झाला, वाहन मिळाले नाही म्हणून जरी कोणी उशीराने आले तरी त्याला परिक्षेला बसू देणार नसल्याचेही त्यांनी जाहीर केले. त्यामुळे परिक्षा काळात विद्यार्थ्यांनी अर्धातास आधी परिक्षा केंद्रवार पोहचावे लागणार आहे. 

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री तावडे यांनी वरील घोषणा केली. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असते. या परीक्षेचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी ११ वाजताच्या पेपरसाठी अर्धा तास अगोदर परीक्षावर्गात येणे अपेक्षित आहे.  या अर्ध्या तासात परीक्षागृहात विदयार्थ्यांचे हॉलतिकीट तपासणे, प्रश्नपत्रिका देणे असे करणे शक्य होणार आहे. विद्यार्थ्यांवरील परीक्षेपूर्वी ताण कमी करुन अर्धा तास अगोदर वर्गात सोडून बरोबर ११ वाजता परीक्षा सुरु करण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला असल्याचे ते  म्हणाले.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना ११ नंतर म्हणजेच साधारण ३१ मिनिटांनी उशिरा आल्यावर परीक्षेला बसता येणार नाही. परीक्षागृहात प्रवेश करताना विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ नये आणि विद्यार्थ्यांना तणावमुक्त पध्दतीने परीक्षा देता यावी यासाठी परीक्षा मंडळाने हा निर्णय घेतला आहे. अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितालाच प्राधान्य देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने, दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीची परीक्षा १ मार्च  ते २४ मार्च २०१८ दरम्यान, तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्च २०१८ दरम्यान होणार आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदरच वर्गात सोडले जाणार असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

राज्यात १९१ वेठबिगार कामगारांची मुक्तता

राज्यात वेठबिगारी निर्मुलनासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून यात जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समित्यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *