Breaking News

अंबादास दानवेंचे मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान, चहापानावर बहिष्कार हा देशद्रोह कसा, सिध्द करा विधान परिषदेत विरोधी पक्षनेत्यांची मागणी, वेलमध्ये विरोधकांची घोषणाबाजी

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जर गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह ठरला असता अशी टीका केली. त्यास प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीला हसिना पारकर हिला पैसे दिले, तो मंत्री तुरुंगात गेल्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्याचे धाडस त्यावेळच्या सरकारने दाखविले नाही. विशेष म्हणजे ते अजित पवार यांचे सहकारी होते. त्यामुळे बरे झाले देशद्रोह्यांच्या साथीदारासोबत चहा पान करण्याची वेळ टळली असे प्रत्युत्तर दिले. या वक्तव्याचे पडसाद आज विधान परिषदेत उमटले. विरोधी पक्षनेते तथा ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी विधान परिषदेचे नियमित कामकाज सुरु झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या त्या विधानावर द्रेश द्रोह कसा असा सवाल करत मुख्यमंत्री शिंदे हे सिध्द करून दाखवावे असे आव्हानच मुख्यमंत्री शिंदेना दिले.
मात्र उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी चर्चेस नकार देत सभागृहाचे कामकाज पुढे नेल्याने विरोधकांनी वेलमध्ये येत एकच गोंधळ घातला.

औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना अंबादास दानवे यांनी चहापानावर बहिष्कार टाकून विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली होती. तसे पत्रही मुख्यमंत्र्यांना दिले होते. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना देशद्रोही ठरवताना स्वत: महाराष्ट्रद्रोही असल्याची कबुली दिली आहे. देशद्रोही कोण हे मुख्यमंत्र्यांनी सिद्ध करावे, चहापानावर बहिष्कार टाकणे हा देशद्रोह कसा होतो, याबाबत सरकारने तात्काळ सभागृहात भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही केली.
यावर उपसभापतींनी संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांना भूमिका मांडण्याचे आदेश परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देतातच चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सभागृहात नाहीत, तेच यावर उत्तर देतील असे त्यांनी सांगताच विरोधकांनी चर्चेची मागणी केली. ही मागणी फेटाळताच विरोधी बाकावरील सदस्य अनिल परब, सचिन अहिर, मनीषा कायंदे, विलास पोतनीस, सुनील शिंदे, एकनाथ खडसे, विक्रम काळे, अनिकेत तटकरे, भाई जगताप यांनी वेलमध्ये येत घोषणा दिल्या. या गदारोळातच नीलम गोऱ्हे यांनी कामकाज पूर्ण केले व शोकप्रस्ताव पुकारला. दिवंगत सदस्य लक्ष्मण जगताप, जयप्रकाश छाजेड आणि सुमंत गायकवाड यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी पाच नवनियुक्त सदस्यांचे स्वागत करण्यात आले. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रवादीचे विक्रम काळे, काँग्रेसचे सुधाकर अडबाळे, अपक्ष सत्यजित तांबे, भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे आणि काँग्रेसच्या धीरज लिंगाडे यांच्या नावाची घोषणा करत त्यांचा अल्पपरिचय करून दिला. तसेच उपसभापतींनी नरेंद्र दराडे (शिवसेना), अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस), जयंत आजगावकर (भाजप), निरंजन डावखरे (भाजप) यांची तालिका अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *