Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर पलटवार, त्यांची मानसिकता ढळली

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकाविल्यानंतर उध्दव ठाकरे आणि त्यांच्या गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. काल चार महिन्यानंतर बुलढाण्यातील चिखली येथील शेतकरी मेळाव्यातही उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरून चांगलाच निशाणा साधला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांनी टीकेवर पलटवार करत प्रत्युत्तर दिले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आपण सगळं खुलेआम करतो, मी जे करतो, ते खुलेआम करतो. लपून-छपून करत नाही. काही लोक लपून-छपून करतात. पण अशी कामं उजेडात येतात. ती लोकांना माहिती होतात. काल दीपक केसरकरांनी एक विधान केलं आहे. ते बोध घेण्यासारखं आहे. त्यामुळे इतरांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वत:कडे पाहावं. हे बोलणं कुणाला लागू पडतंय ते बघावं. फ्रीजमध्ये भरून कुठे खोके गेले असं केसरकर म्हणाले आहेत. मी त्याचा आता शोध घेतो आणि नंतर त्यावर बोलतो, असे सांगत उध्दव ठाकरे यांना सूचक इशारा दिला.

सगळ्या जगाला माहिती आहे की हे जे बोलतायत, ते छोटे छोटे खोके आहेत. मोठे खोके घेण्याची ऐपत आमदारांची आहे का? फ्रीजएवढ्या कंटेनरमधले खोके कुणाकडे जातात आणि ते कोण पचवू शकतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. एक दिवस हे सगळं जनतेच्या समोर येईल. केसरकरांनी हे सूचक विधान केलं असल्याचेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांच्याकडून आणखीन काय अपेक्षा करणार. त्यांची मानसिकता ढळली आहे. नैराश्यातून अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होतंय. मला वाटत होतं की नैराश्य यायला त्यांना फार वेळ लागेल. पण ते आधीच आलं आहे, असा खोचक टोलाही लगावला.

यापूर्वीही महाराष्ट्रात एक नकारात्मकता होती. ते वातावरण आम्ही सरकार बनवल्यानंतर बदललं आहे. एक सकारात्मकता तयार झाली आहे. आमच्या सरकारबद्दल लोकांचं मत चांगलं आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या छातीत धडकी भरली आहे. त्यांना धक्क्यावर धक्के बसतायत. त्यामुळे त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होतंय, अशी खोचक टीपण्णीही त्यांनी केली.

Check Also

हिंदूत्ववादी राजकारणात मुस्लिमांचा ओढा उद्धव ठाकरे यांच्याकडे

साधारणतः २०१९ साली महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घटना घडली. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेना बाहेर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *