Breaking News

आदित्य ठाकरे यांची मागणी, महापालिकेतील रस्ते घोटाळ्याची लोकायुक्तांकडून चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

मुंबई महानगरपालिकेत गेल्या सहा-सात महिन्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. रस्त्यांच्या कामांमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. त्याची तक्रार करूनही महापालिकेच्या प्रशासकांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे राज्यपालांनी याप्रकरणी गंभीर दखल घेऊन मुंबईतील रस्ते घोटाळा व अन्य भ्रष्टाचाराची लोकायुक्तांकडून चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली.

शिवसेनेचे शिष्टमंडळ घेऊन आदित्य ठाकरे यांनी आज राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली आणि यासंदर्भात निवेदन दिले.

बैठकीनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई महानगरपालिकेत प्रशासकांचे हुकूमशाही वर्तंन आणि उघडपणे सुरू असलेला भ्रष्टाचार हा चिंतेचा विषय बनला आहे. आर्थिक गैरव्यवस्थापन, मर्जीतल्या कंत्राटदारांना दिली जाणारी कंत्राटे, रस्त्यांचा मेगा टेंडर घोटाळा, खडी मक्तेदारी घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा, सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशिन घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांबद्दल विविध राजकीय पक्षांच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींनी तक्रारी केल्या होत्या. माध्यमे आणि मुंबईकर नागरिकांनीही त्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंग चहल यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळालेले नाही, असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुंबईतील घोटाळ्यांप्रकरणी राज्यपालांना माहिती दिली. ४०० किलोमीटरच्या ९०० रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी जानेवारीमध्ये टेंडर्स काढण्यात आली. परंतु त्यातील दहा रस्तेही अद्याप कॉंक्रिटचे झालेले नाहीत, असे सांगतानाच, या रॅकेटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या जवळचे कुणीतरी आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. एका ठराविक कंपनीकडूनच खडी खरेदी करावी म्हणून मुंबईतील गोखले पूल, डिलाईल रोड पूल या पूलांची कामे तीन आठवडे बंद होती. स्ट्रीट फर्निचरची १६० कोटींची कामे २६३ कोटी रुपयांना देण्यात आली, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
सध्याचे मुख्यमंत्री हे करप्टमॅन आहेत अशीही टीका त्यांनी केली.

यावेळी शिष्टमंडळात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार अरविंद सावंत, पक्षाचे सचिव-खासदार अनिल देसाई, खासदार प्रियांका चतुर्वेदी, उपनेते सचिन अहिर, आमदार अनिल परब, सुनील प्रभू, सुनिल शिंदे, अजय चौधरी, विलास पोतनीस, संजय पोतनीस, राजन साळवी, ऋतुजा लटके, रमेश कोरगावकर, प्रकाश फातर्पेकर आदींचा समावेश होता.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *