Breaking News

शरद पवारांबरोबरील बैठकीनंतर उदय सामंत यांची स्पष्टोक्तीः आम्ही चर्चेस तयार, राज ठाकरेंना भेटणार स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाची अंमलबजावणी करू

नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध वाढू लागल्यानंतर रिफायनरीचा प्रकल्प रत्नागिरीतल्या राजापूरमधील बारसू येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या प्रकल्पावरून शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थानिकांना विश्वासात घेतल्यानंतर असे आश्वासन देत रिफायनरी प्रकल्प राबविण्याच्यादृष्टीने हालचाली सुरु केल्या. मात्र प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या माती परिक्षणाला सुरुवात करताच स्थानिकांचा विरोध मोठ्या प्रमाणावर सुरू झाला आहे. हा विरोध पोलीस बळाचा वापर करून मोडून काढत मंगळवारी ड्रिलिंगचे काम सुरू करण्यात आले. यावेळी पोलिसांनी ११० आंदोलकांना ताब्यातही घेतले. परंतु या घटनांचे तीव्र पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटताना दिसून येत असून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना आज २६ एप्रिल रोजी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.

या बैठकीवेळी दोघांमध्ये बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी आणि त्याला सुरू असलेल्या विरोधाबाबत चर्चा झाली. शरद पवारांच्या भेटीनंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी बातचित केली. यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, ही राजकीय बैठक नव्हती. बारसूमधील सध्याची परिस्थिती काय आहे, तिथे काल काय परिस्थिती निर्माण झाली होती त्याची माहिती मी शरद पवारांना दिली.

उदय सामंत यांनी सांगितलं की, काल येथे आंदोलक महिलांना अटक केली होती. परंतु त्यांना आता सोडून दिलं आहे. प्रशासन आणि शासनाने शेतकऱ्यांशी बोललं पाहिजे. शासन बोलायला तयार आहे. जिल्हा प्रशासनाने तिथल्या ३०० ते ३५० लोकांसोबत बैठक आयोजित केली. त्यांच्याशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊन पुढील हालचाली केल्या जातील अशी ग्वाही दिली.

उदय सामंत म्हणाले की, मला एक गोष्ट इथे नमूद करायची आहे की, जसे या रिफायनरीला विरोध करणारे विरोधक आहेत तसेच समर्थकही आहेत. तसेच तिथे सर्वेक्षण नव्हे तर केवळ मातीचं परिक्षण सुरू होणार आहे. त्यानंतर तिथे प्रकल्प आणायचा की नाही हे कंपनी ठरवेल. शेतकऱ्यांनी शासनाला सहकार्य करावं. शेतकऱ्यांचे गैरसमज दूर करण्यास शासन कटीबद्ध आहे. याबाबत आज शरद पवारांशी चर्चा झाल्याचेही स्पष्ट केले.

बारसूमध्ये होणारी रिफायनरी ही ग्रीन रिफायनरी आहे आणि सर्वेक्षण करून आठ दिवसांत तिथे रिफायनरीचं काम सुरू होईल, अशा प्रकारचं वातावरण निर्माण केलं जात आहे. हे चुकीचं आहे. सध्या केवळ मातीचं परीक्षण केलं जात आहे, त्यानंतर इथे रिफायनरी सुरू करायची की नाही, याबाबतचा निर्णय होईल, यादरम्यान स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करता येईल”, असंही ते म्हणाले.

बारसूमध्ये होणाऱ्या रिफायनरीबाबत गेल्या आठ दिवसांत प्रशासनाने स्थानिकांबरोबर तीन बैठका घेतल्या आहेत. याबाबत उद्याही बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. तसेच विरोधकांनी केवळ विरोधाचं राजकारण न करता काही सुचना असतील तर त्या सरकारपर्यंत पोहोचवाव्या, असे आवाहनही ठाकरे गटाच्या नेत्यांना उदय सामंत यांनी केलं.

तसेच बारसू प्रकल्पाबाबत राज ठाकरे यांनी भेट घेणार असल्याची माहितीही उदय सामंत यांनी दिली. राज ठाकरे यांची कोकणा सभा होणार आहे. त्यांनी बारसूमध्ये जाऊन येथील परिस्थिती समजून घ्यावी. अशी विनंती आम्ही राज ठाकरे यांना केली आहे. याबाबत आज मी राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *