Breaking News

निवडणूक आयोगासमोर आज ठाकरे गटाने मांडले म्हणणे, अनिल देसाईंनी दिली माहिती शिंदे गटाचा दावा चुकीचा, उध्दव ठाकरे गटाचा दावा

शिवसेना पक्ष कोणाचा याप्रकरणी आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज निवडणूक आयोगासमोर उध्दव ठाकरे गटाने आपलं म्हणणं मांडत शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाणावर करण्यात आलेला दावा चुकीचा असल्याचे आयोगास सांगितले. तसेच ठाकरे गटाने आपलं म्हणणं ई-मेलद्वारे आयोगासमोर सादर केल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई यांनी वृत्तवाहीनीशी बोलताना दिली.

दोन्ही गटाकडून शिवसेना पक्षावर करण्यात आलेल्या दाव्यावरून यासंदर्भातील कागदपत्रे व लेखी युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आले होते. त्यानुसार आज ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाकडे ई-मेलद्वारे लेखी युक्तिवाद सादर करण्यात आला आहे.

यावेळी ठाकरे गटाचे सचिव अनिल देसाई म्हणाले, २१ जूनपासून जो घटनाक्रम घडला, तो सर्व घटनाक्रम आम्ही निवडणूक आयोगाला दिलेल्या लेखी युक्तिवादात सादर करत दाखल केला. यामध्ये सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबरोबरच यापूर्वी निवडणूक आयोगापुढे झालेल्या सुनावणीतील मुद्द्यांचाही समावेश आहे. याचबरोबर शिंदे गटाने ज्या प्रकारे शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्हावर दावा केला होता, तो दावा नेमका कसा चुकीचा आहे, हे देखील आम्ही या युक्तिवादात मांडलं असल्याची माहिती दिली.

यावेळी बोलताना अनिल देसाई म्हणाले, तसेच आमदार, खासदार सोडून गेल्याने पूर्ण पक्ष त्यांचा होत नाही. पक्ष हा पूर्णपणे वेगळा असतो. पक्षाची विचारधारा आणि पक्षाचे नेतृत्व या गोष्टी बघून मतदार मतदान करत असतात. त्यामुळे एखाद्या आमदार-खासदाराने ही जनताच माझी आहे म्हणणं, हा दावाच मुळात चुकीचा आहे. या सर्व गोष्टी आम्ही कायद्याच्या चौकटीत बसवून निवडणूक आयोगापुढे मांडल्या असल्याचेही स्पष्ट केले.

आम्ही तीन लाख प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. तसेच २० लाख प्राथमिक सदस्यत्वाचे पुरावे दिले आहेत. त्यानुसार शिंदे गटाने काय पुरावे दिले, याची पडताळणी करा आणि आम्हाला न्याय द्या, अशी मागणी आयोगापुढे केली असल्याची माहितीही देसाई यांनी दिली.

तसेच हा निकाल आमच्याच बाजुने लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Check Also

पंतप्रधान मोदी यांचे टीकास्त्र, शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ

दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *