Breaking News

शिंदे गटाचा सवाल, प्रस्थापित शिक्षण सम्राटांनी मराठा मुलांना आरक्षण का दिले नाही? उद्धव ठाकरेंनी कामगार सेना विकली, मुंबईतले उद्योग बंद करण्यास मालकांना मदत केली

कुठे काय चांगले होत असेल तर उबाठा पक्ष आणि त्यांच्या सहकारी पक्षातील लोकांच्या पोटात दुखू लागते. सुरत डायमंड हब गुजरातमध्ये तयार झाल्यावर आरडाओरडा करणारे, ज्यावेळेस सुरत डायमंड हबच्या कामाला २०१५ मध्ये सुरुवात झाली तेव्हा हे झोपले होते का? त्यावेळेस हे का बोलले नाहीत. हे डायमंड पोर्ट गुजरातला का गेला, याची यांना माहिती आहे का? ज्या प्रकारे मातोश्री समोरील बेहराम पाड्यामध्ये ३-३ माळ्याच्या झोपडपट्ट्या उभ्या झाल्यावर हे यांना कळते, त्याच प्रकारे सुरत डायमंड हब तयार झाल्यावर यांना जाग येते का, असा गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे सचिव व प्रवक्ते किरण पावसकर यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला.

शिंदे गटाचे प्रवक्ते  किरण पावसकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातून उद्योग बाहेर जात आहेत, त्याला आम्ही जबाबदार आहोत अशी भूमिका मांडणारे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे कसे विसरले की महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या जाणारे उद्योग मग वेदांत फॉक्सकॉन असो, टाटा एयरबस असो किंवा बल्क ड्रग पार्क असो, ज्यावेळेस सप्टेंबर २०२० मध्ये वेदांत फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गेले, ऑक्टोबर २०२० मध्ये जेव्हा बल्क ड्रग पार्क महाराष्ट्राबाहेर गेले, तेव्हा महाराष्ट्रात सरकार कुणाचे होते? याचा त्यांना विसर पडला का? असा सवाल केला.

पुढे बोलताना किरण पावसकर म्हणाले, एयर इंडियाचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले तेव्हा सरकार कुणाचे होते हे संसदरत्न सुप्रिया सुळेंना माहीत आहे का? यांचे आरोप प्रत्यारोप सुरु केले की समजावे कुठे तरी कोणत्या तरी प्रकल्पाचे उदघाटन होत आहे. मुंबईतून आपला उद्योग बंद करून बाहेर जाणाऱ्या कंपन्यांना जरी सांभाळले असते, तरी महाराष्ट्रातील जनतेच्या नोकऱ्या वाचल्या असत्या. रिजेंसी हॉटेल, लार्सन अँड टुब्रो, कंबाटा एयरलाईन्स सारख्या कंपन्यांमध्ये उबाठा पक्षाच्या युनियन आहेत. मग या कंपन्या बंद का झाल्या. अहो साध्या बंद पडलेल्या किंगफिशर एयरलाईन्स आणि जेट एयरलाईन्स च्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी मिळवून देऊ शकले नाहीत, ते देण्याचे काम एकनाथ शिंदेंनी केले. याउलट उद्धव ठाकरेंनी कामगार सेना विकली आणि मुंबईतले उद्योग बंद करण्यास मालकांना मदत केली.

किरण पावसकर म्हणाले, महाराष्ट्रातील लार्सन अँड टुबरो, रिजेन्सी हॉटेल, महानंदा डेअरी, कंबाटा एयरलाईन्स सारख्या कंपन्या बंद झाल्या हजारो कर्मचारी बेरोजगार झाले, हे पाप मागील उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे पाप आहे. हे आमच्यावर काय आरोप करताहेत. उलट माझा असा आरोप आहे की, यांचे सरकार गेलंय, आता काही कामधंदा उरलेला नाही, टक्केवारी बंद झाली, या आकसापोटी व सूडाच्या भावनेने संसदरत्न सुप्रिया सुळे आणि युवराज आदित्य ठाकरे आमच्यावर उठसूट आरोप करत आहेत. सुप्रिया सुळे आणि आदित्य ठाकरे यांनी आपले निकामी उद्योग बंद करावेत आणि जनतेची सेवा करण्यात अपयशी ठरल्यामुळेच त्यांच्या महाविकास आघाडी सरकारला घरी बसावे लागले, हे त्यांनी मान्य करावे, असा टोलाही लगावला.

मराठा अरक्षणावरून होणाऱ्या विरोधकांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना किरण पावसकर म्हणाले की, मराठा समाजाला टिकणारे आरक्षण फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देणार, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. पण आज त्यावरून आरोप करणाऱ्या विरोधक हे विसरले की, आज मराठा समाजाला जे आंदोलन करावे लागत आहे, हे पाप उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचेच आहे. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे विसरले होते का. आम्हाला अरक्षणावरून प्रश्न हे करतात, आज यांच्या आणि यांच्या सहकारी पक्षातील लोकांच्या इंटरनॅशनल शाळा आणि कॉलेजेस आहेत. ते स्वतःला शिक्षण सम्राट समजतात, मग या प्रस्थापित मराठा शिक्षण सम्राटांनी मराठा मुलांना आपल्या शिक्षण संस्थेत आरक्षण का दिले नाही ? असा सवाल केला.

Check Also

काँग्रेस नेते नसीम खान यांची नाराजी दूर म्हणाले, वर्षा गायकवाड माझ्या लहान बहिण

लोकसभा निवडणूकीच्या उमेदवारीवरून काहीसे नाराज झालेल्या काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांनी काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *