Breaking News

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, जागावाटपाबाबत मविआची लवकरच बैठक

तीन राज्यांचा निकाल अपेक्षेप्रमाणे लागला नाही, ही गोष्ट मान्य करावी लागेल. पण याचा अर्थ उद्याच्या निवडणुकीला आम्हाला सगळ्यांना अडचणी आहेत, असं अजिबात होत नाही. आज इंडिया आघाडीत आम्ही जे एकत्र आहोत, त्यांनी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची आवश्यकता आहे. यासाठी खबरदारी घेण्याची आमची तयारी आहे. त्या कामास आम्ही सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी काळात एकत्र लढल्यास आम्हाला यश नक्कीच मिळेल असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, देशातील मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांमध्ये कुठलेही ठोस काम जनतेसाठी केले नाही आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये जनतेसमोर जाताना ठोस कार्यक्रम नसल्याने राम मंदिराच्या माध्यमातून जनतेमध्ये येऊन वेगळं मत तयार करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे अशी टीकाही केली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, राम मंदिर झाल्याचा आनंद आहे, पण बाबरी पडली तेव्हा तिथे केवळ एकच पक्ष होता. एकच नेता सांगत होता ‘बाबरी आम्ही पाडली’ आणि ते बाळासाहेब ठाकरे होते. बाकी कुणी म्हटलं नव्हतं बाबरी आम्ही पाडली म्हणून, त्यामुळे जो काही संघर्ष होता, त्यामध्ये शिवसेनेची भूमिका होती की नाही, याबद्दल वाद घालण्यात काही अर्थ नाही. शिवसेनेची भूमिका होती हे आम्ही स्वत: बाळासाहेबांच्या वक्तव्यांमधून ऐकलं होतं. बाबरी पाडण्याची जबाबदारी एकट्या बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती अशी आठवणही यावेळी करून देत भाजपावर टीका केली.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर यांना इंडिया आघाडीत घेण्यासाठी मी प्रयत्न केले आहेत. इंडिया आघाडीच्या दिल्लीतील बैठकीत माझ्या शेजारीच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे बसले होते. मी त्यांना सुचवले की, प्रकाश आंबेडकर यांना एकत्र घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर यावर काही बैठक झाली की नाही? याबाबत मला कल्पना नाही. आमच्या सर्वांची इच्छा आहे की, आंबेडकरांना एकत्र घेऊन निवडणुकीला सामोरे जावे असे ही स्पष्ट केले.

आघाडीचा पंतप्रधान पदाच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले की, निवडणुक लढवण्यासाठी चेहऱ्याची आवश्यकता असल्याचं काही कारण नाही. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर न केल्यास काहीही फरक पडणार नाही. १९७७ सालच्या निवडणुकीत पंतप्रधान पदासाठी कोणताही चेहरा जाहीर करण्यात आला नव्हता. निवडणुक झाल्यावर मोरारजी देसाई यांची निवड करण्यात आली. देसाईंचा चेहरा वापरून १९७७ सालची निवडणूक लढली गेली नाही. त्यामुळं २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी देखील पंतप्रधान पदासाठी चेहरा जाहीर न केल्यास काही फरक पडणार नाही असेही सांगितले.

राष्ट्रवादीने पाठींबा दिलेल्या उमेदवारांबाबत बोलताना शरद पवार यांनी स्पष्टच सांगितले की, यावेळेला अमरावतीचा निर्णय महाविकास आघाडीचे तीनही घटक पक्ष एकत्र बसून घेतील. मागच्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होता. तसेच जिल्ह्यातील आमच्या कार्यकर्त्यांना हा मतदारसंघ पक्षाकडे हवा आहे. त्यामुळे जागावाटपाची चर्चा करताना त्याबद्दल आमची भूमिका मांडू असेही स्पष्ट केले.

मायावती यांच्याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, मायावतींचा महत्वाचा रोल उत्तर प्रदेशध्ये आहे. मात्र, आमचा सहकारी पक्ष म्हणजे समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशामध्ये मजबूत आहे. समाजवादी पार्टीला दुखावून आम्ही अन्य कुणाला सोबत घ्यायचा विचार करत नसल्याचे सांगत संसदेत घुसखोरी झाली. त्यावर प्रश्न विचारले म्हणून खासदारांचे निलंबन करण्यात आले. त्यांची काय चूक होती. सभागृह चालू असताना बाहेरचे लोक येतात आणि गॅस सोडतात त्याची माहिती घ्यायला नको का? संसद सरकार कशा पद्धतीने चालवू पाहतेय याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे अशी खोचक टीकाही भाजपावर केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *