Breaking News

सांगली, कोल्हापूर मंत्र्यांसाठी जलपर्यटन क्षेत्र घोषीत करा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा टोला

मुंबई: प्रतिनिधी
कोल्हापूर, सांगली आणि साता-यातील जनतेचे आयुष्य भीषण पूरपरिस्थितीमुळे उद्धवस्त झाले असताना दोन दिवस पूरात बुडल्याशिवाय मदत मिळणार नाही, असा आदेश काढणा-या असंवेदनशील व बेफिकीर सरकारला जनतेचा तळतळाट लागल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टीका करत पश्चिम महाराष्ट्राला पुराने वेढले असताना जलसंपदा मंत्री महाजन हे सेल्फीचा आनंद काढत फिरत आहेत. त्यामुळे पुरग्रस्त भाग मंत्र्यासाठी पर्यटन क्षेत्र घोषित करावा अशी उपरोधिक मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
पश्चिम महाराष्ट्र पूराने वेढलेला आहे. तेथील जनतेचे आयुष्य उद्धवस्त झालेले असताना जलसंपदा मंत्री गिरीष महाजन त्या पूराच्या पाण्यात जलपर्यटनाचा आनंद घेत आहेत, हे चित्र संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे. अशा भीषण परिस्थितीत मृत्यू थैमान घालत असताना सेल्फी घेण्याचा विचारच कसा येऊ शकतो? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
गिरीष महाजन यांचा विकट हास्य करणारा चेहरा या सरकारचे चरित्र, विचार आणि ओळख दर्शवणारा आहे. हा चेहरा तोच आहे ज्यांना आमदार फोडण्यामध्ये आनंद मिळतो. शाळेतील लहान मुलांना बंदूक दाखवतो. सत्तेच्या धुंदीत बेफाम नाचतो, फाईटींग करतो आणि हिरोगीरी दाखवण्याकरिता वाघाच्या मागे स्वतःची बंदूक घेऊन फिरतो. हा याच सरकारचा चेहरा आहे, जे तिवरे धरण फुटीकरिता खेकड्यांना दोषी ठरवतात. कोल्हापूर, सांगली, साता-यासह महाराष्ट्र पुरात बुडालेला असताना महाजनादेश यात्रेत गुंग असतात. मुंबईत मालाड येथे भिंत कोसळून माणसे मेली तरी मुंबई वाचवली असे म्हणतात. म्हणूनच गिरीष महाजन यांना ब्रँड अम्बॅसीडर नियुक्त करावे असा टोलाही त्यांनी लगावला.
केवळ राज्यातील मंत्र्यांकरिता कोल्हापूर, सांगली, साता-याला विशेष जलपर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करावे अशी उपरोधिक मागणी करत या पूरात मृत पावलेल्यांचे मृतदेह पाहून लोकांचे ह्रदय द्रवले. मुलाला छातीशी कवटाळून मृत्यूला सामोरे गेलेल्या आईचा मृतदेह पाहून संपूर्ण महाराष्ट्र ढसा ढसा रडत असताना सेल्फी काढण्याचा आनंद घेणा-या मंत्र्यांकरिता सेल्फी विथ डेथ हा उपक्रम सुरु करावा अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *