Breaking News

पंतप्रधान मोदींकडून ४६ महिन्यात जाहीरातबाजीवर ४ हजार कोटींची उधळपट्टी चोहोबाजूंच्या टिकेनंतर चालू वर्षाच्या खर्चात २५ टक्यांची कपात

मुंबई : प्रतिनिधी

देशाच्या सर्वोच्च पदी अर्थात पंतप्रधान पदी विराजमान होण्या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारकडून जाहीरातबाजीवर करण्यात येत असलेल्या खर्चावर प्रश्न विचारले जात होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ४६ महिन्याच्या कारकिर्दीत सरकार आणि स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर ४ हजार ३४३.२६ कोटी रूपये खर्च करण्यात आल्याची माहिती नुकतीच माहिती अधिकारात उघडकीस आली आहे.

केंद्र सरकारच्या विविध योजना व पंतप्रधानांची प्रतिमा संवर्धनासाठी देशभरातील वर्तमान पत्र, दूरचित्रवाणी माध्यमांवर जाहीराती प्रसारीत करण्यात येतात. या जाहीरातींवर आतापर्यंत किती खर्च करण्यात आला याची माहिती आरटीआय कार्यकर्त्ये अनिल गलगली यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गंत ब्युरो ऑफ आऊटरिच एंड कम्युनिकेशन या खात्याकडे माहिती विचारली. त्यावेळी ४ हजार ३४३.२६ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आल्याची माहिती सदर विभागाने दिली. तसेच या उधळपट्टीवर चोहोबाजूंनी टीका केल्यानंतर यावर्षीच्या खर्चात २५ टक्यांची कपात करत मोदी सरकारने ३०८ कोटी गत वर्षाच्या तुलनेत कमी खर्च केल्याचे सांगितले.

यासंदर्भात केंद्र सरकारच्या ब्युरो ऑफ आऊटरिच एंड कम्युनिकेशन खात्याचे वित्तीय सल्लागार तपन सुत्रधर यांनी अनिल गलगली यांस १ जून २०१४ पासूनची माहिती उपलब्ध करुन दिली आहे. यात १ जून २०१४ पासून ३१ मार्च २०१५ या कालावधीत ४२४.८५ कोटी वर्तमान पत्र अर्थात प्रिंट मीडिया, ४४८.९७ कोटी दूरचित्रवाणी माध्यम अर्थात इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ७९.७२ कोटी बाह्य प्रचारावर खर्च करण्यात आले. वर्ष २०१५-१६ या आर्थिक वर्षात ५१०.६९ कोटी प्रिंट मीडिया, ५४१.९९ कोटी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि ११८.४३ कोटी बाह्य प्रचारावर खर्च केले आहे. वर्ष २०१६-१७ या आर्थिक वर्षात ४६३.३८ कोटी प्रिंट मीडिया, ६१३.७८ कोटी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि १८५.९९ कोटी बाह्य प्रचारावर खर्च केले आहे. १ एप्रिल २०१७ पासून ७ डिसेंबर २०१८ कालावधीत ३३३.२३ कोटी प्रिंट मीडियावर खर्च केले. १ एप्रिल २०१७ पासून ३१ मार्च २०१८ या कालावधीत इलेक्ट्रॉनिक मीडियावर ४७५.१३ कोटी खर्च केले आणि बाह्य प्रचारात १४७.१० कोटी हे १ एप्रिल २०१७ पासून ३१ जानेवारी २०१८ पर्यंत खर्च करण्यात आले आहे.

विरोधी पक्ष आणि सोशल मीडियावर जनतेचा पैसा जाहिरातीबाजीवर कशा उधळला जातो. यावर सडकून झालेल्या टीकेनंतर कदाचित मोदी सरकारने वर्ष २०१७-१८ या आर्थिक वर्षात खर्चात कपात केली असल्याची बाब समोर आली आहे. वर्ष २०१६-१७ आर्थिक वर्षात एकूण १२६३.१५ कोटी खर्च करणाऱ्या सरकारने वर्ष २०१७-१८ या आर्थिक वर्षात  ९५५.४६ कोटी खर्च केले आहे. ३०८ कोटी कमी खर्च करत जवळपास २५ टक्क्यांची कपात केली गेली आहे.

अनिल गलगली यांच्या मते आवश्यक जाहिरात करणे अपेक्षित आहे पण कधी-कधी अनावश्यक जाहिरातबाजी करत जनतेच्या पैश्याची उधळपट्टी केली जात असून एकूण एक खर्चाची इत्यंभूत माहिती संकेतस्थळावर प्रकाशित करणे आवश्यक आहे. 

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *