Breaking News

राजकीय हित साधण्यासाठीच सरकारकडून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचा आरोप

औरंगाबाद : प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव आणि औरंगाबाद येथील घटना पा‍हता सामाजिक अशांतता निर्माण करुन राजकीय हित साधण्‍याचा सरकारचा प्रयत्‍न दिसतो. स्‍थानिक पातळीवर सत्‍ताधारी पक्षाचे खासदारही प्रक्षोभक वक्‍तव्‍य करुन सामाजिक तेढ निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न करतात, त्‍यांच्‍यावर सरकार कारवाई करणार का? असा सवाल करुन औरंगाबाद येथील घटनेत गृहखाते पूर्णतः अपयशी ठरले असल्‍याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची देखील त्‍यांनी मागणी केली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी रविवारी औरंगाबादच्या राजाबाजार, मोतीकारंजा, शहागंज, गांधीनगर, चेलीपुरा येथील दंगलग्रस्त भागाची पाहणी करून दंगलीत नुकसान झालेल्या स्थानिक नागरिक, व्यापारी, छोटे व्यावसायिक यांच्याशी संवाद साधून या घटनेची माहिती जाणून घेतली. या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांची भेट घेऊन विखे पाटील यांनी दिलासा दिला. त्याचबरोबर या घटनेत जखमी झालेल्या पोलीस अधिकार्‍यांची रूग्णालयात जाऊन भेट घेत विचारपूस केली.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दंगलग्रस्त भागात तब्बल दोन तास फिरून झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार, आ. सुभाष झांबड, माजी आमदार डॉ. कल्याण काळे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

पाहणीनंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून विखे पाटील म्हणाले की, या घटनेच्या मुळापर्यंत जाण्याची खरी गरज निर्माण झाली आहे. या भागात छोट्याशा कारणाने निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर एवढ्या मोठ्या घटनेत होते पोलिसांची गुप्तचर यंत्रणा भजे खात होती का? असा प्रश्न उपस्थित करून यापुर्वी कचरा डेपोच्या कारणाने निर्माण झालेला तणावाच्या आठवणी ताज्या असतानाही स्थानिक पातळीवर पोलीस अधिकारी इतक्या हलगर्जीपणे वागतात याबद्दल विरोधी पक्षनेत्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

औरंगाबादच्या घटनेची पार्श्वभूमी पाहता भीमा-कोरेगावच्या घटनेतही पोलीसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली होती. मला मिळालेल्या माहितीनुसार व स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना विचारात घेतल्या तर पोलीसांची भूमिका हलगर्जीपणा दाखविणारी असल्याचा आरोप विखे पाटील यांनी केला. या शहराला मागील दोन महिन्यापासून पोलीस आयुक्त नाही ही बाब मुख्यमंत्र्यांना माहित असू नये, हे राज्याचे दुर्दैव आहे. गृह विभागाचा नाकर्तेपणाच यामुळे समोर आला असल्याकडे लक्ष वेधून विखे पाटील यांनी सांगितले की, घटना घडल्यानंतर पालकमंत्री, गृहमंत्री आले, पण शहराला पोलीस आयुक्त नेमण्यची मागणी मुख्यमंत्र्यांकडे एकालाही यापुर्वी करावीशी वाटली नाही हे दुर्देव आहे.

शिवसेना आज स्वतंत्र गृहमंत्री हवा आशी मागणी करत आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्यानंतर शिवसेनेला जाणीव झाली असल्याचा टोला लगावून विरोधी पक्षनेत्यांनी शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर जोरदार टीका केली. राज्याच्या कायदा सुव्यवस्थेबाबत शिवसेनेला एवढीच काळजी असेल तर औरंगाबादच्या घटनेवरून तातडीने सता सोडण्याचे आवाहन त्यांनी शिवसेनेला दिले. शिवसेनेने सामान्‍य लोकांच्‍या सरनावर राजकारण करु नये अशा शब्‍दात विखे पाटील यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.

मुख्यमंत्री गृहमंत्री पदाचा अट्टाहास सोडायला तयार नाहीत या राज्याला स्वतंत्र गृहमंत्री हवा अशी मागणी पहिल्या वर्षापासून आम्ही करत आहोत. मुख्यमंत्री म्हणतात मी पार्ट टाईम गृहमंत्री आहे. पण इकडे गुंड फुलटाईम कामाला लागले असल्या टोला विखे पाटील यांनी लगावला. औरंगाबादच्या घटनेचा विचार केला तर गृहमंत्री या नात्याने जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे जाते. आलेले अपयश ते टाळू शकत नाहीत म्हणून नैतिकजबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेत्यांनी यावेळी पुन्हा केली.

दंगलीच्या घटनेत व्यावसायिक, सामान्य नागरिक आणि छोट्या छोट्या व्यावसायिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून भरपाई द्यावी, मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मदत जाहीर करावी, समाजकंटकावर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील केली.

Check Also

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन वयाच्या ७२ व्या वर्षी कर्करोगामुळे घेतला शेवटचा श्वास

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांचे सोमवारी वयाच्या ७२ व्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *