Breaking News

देशातील बँक लुटून गेलेले लोक अद्याप चौकीदाराला सापडले नाहीत

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

औरंगाबाद – कन्नड : प्रतिनिधी

या भाजपचे सरकार आल्यावर बँकांवर दरोडे घालून दिवसाढवळया काही लोक निघून गेले. परंतु ते दरोडेखोर चौकीदाराला अद्याप सापडले नसल्याची खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कन्नडच्या जाहीर सभेत केली.

राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन निर्धार यात्रा कन्नड येथे आल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

पाच राज्यात पराभवाला सामोरे गेल्यानंतर भाजप सरकार सावध झाले असून वेगवेगळी आश्वासने द्यायला लागले. परंतु खोटी आश्वासने देणाऱ्या भाजप सरकारला पुन्हा निवडून देणार नाही असा निर्णय या देशातील जनतेने घेतला असल्याचे सांगत भाजप सरकार या देशात विकास करण्यात अपयशी ठरली आहे. नोकऱ्यांची आश्वासने आणि विकासाच्या आश्वासनांची गाजरं दाखवण्यात यशस्वी झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे काम आमच्या काळात पूर्ण होणार होते. मात्र आमचे सरकार गेले. परंतु तुम्ही साडेचार वर्षांत स्मारकाची एक वीटही रचू शकला नाहीत. आघाडीचा खासदार निवडून आणा. २० वर्षात जे काम झाले नाही ते काम आघाडीचा उमेदवार निवडून आल्यावर करु असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

पेट्रोल पंपांचा वापर पंतप्रधानांनी स्वतः च्या प्रसिध्दीसाठी केला -अजित पवार

पेट्रोल पंपाचा वापर पंतप्रधानांनी स्वतः च्या प्रसिध्दीसाठी केला असून असा प्रकार यापूर्वी कधीही पाहिला नाही असा थेट आरोप पक्षनेते अजितदादा पवार यांनी केला.

साडेचार वर्षांत या भाजप सरकारने लोकांना फक्त गाजरंच दाखवण्याचे काम केले. पाच राज्यांनी या सरकारला नाकारलं. सर्वसामान्य माणसाला चांगली वागणूक मिळत नसल्यानेच हा बदल झाल्याचे सांगत शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून शरद पवार साहेबांकडे पाहिले जाते. ७१ हजार कोटीची कर्जमाफी साहेबांनी करुन दाखवली. पवारसाहेबांनी शेतकऱ्यांना शेतीला आधारभूत किंमत मिळवून दिली होती. परंतु आज हे लोकांना काही देत नाही नुसत्या घोषणा सुरु करण्यात हे सरकार पटाईत आहे अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

चाय पे चर्चा आणि मन की बातमधून आमच्या समस्या सुटणार आहेत का? असा सवाल विचारत या देशात तरूणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु देण्याचे सोडा एक लाख तरुणांच्या नोकर्‍या घालवल्या असल्याचा आरोप त्यांनी केला.  आज गल्लीपासून दिल्ली पर्यंत भाजपचे सरकार आहे. मग आरक्षण मागणाऱ्या समाजांना अद्याप न्याय का देत नाही ? असा जाबही त्यांनी विचारला.  

दुष्काळाने होरपळलेल्या जनतेसाठी सरकार तिजोरी खाली करत नाही -धनंजय मुंडे

आज मराठवाडा दुष्काळाने होरपळत आहे. निसर्ग कोपतो, त्यावेळी आपली तिजोरी खाली करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला होता. परंतु हे सरकार तिजोरी शेतकऱ्यांसाठी खाली करण्याचे सोडा एक दमडीही देत नसल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला.

छत्रपतींचा अपमान केला आहे. तो अपमान आपला असून अपमान करणाऱ्या या सरकारला बदलायलाच हवे असे आवाहन करत येणाऱ्या लोकसभेत देशातील १२५ कोटी जनता आता परिवर्तन मागत असल्याचे त्यांनी सांगितले.  

आज या शेतकऱ्यांचा कुणीही वाली नाही. कर्जमाफी दिली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ही कर्जमाफी करत छत्रपतींचा अपमान केल्याचा आरोप करत महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात शेतकऱ्यांचा मुलगा नसल्याने आज शेतकऱ्यांना संकटांना सामोरे जावे लागत असल्याचे ते म्हणाले.

बंजारा समाजाच्या मुलाला तुरुंगात का मारलं? छगन भुजबळ

वंचित बहुजन नेत्यांशी चर्चा करण्यासाठी औरंगाबादमध्ये होतो त्यावेळी कन्नड येथील बंजारा समाजाचा तरुण योगेश राठोड याचा मृत्यू जेलमध्ये झाला. त्याठिकाणी जावून माहिती घेतली असता तो तरुण रक्तबंबाळ सापडला. त्याचे फोटो माझ्याजवळ आहेत. २४ तास झाले शवविच्छेदन झाले नाही. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या खूणा आहेत असे डॉक्टरांनी सांगितले. 

जेलच्या लोकांनी त्या तरुणाचा खून का केला या राज्यात काय चालले आहे कुणी अधिकार दिला तुम्हाला मारण्याचा असा संतप्त सवाल माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केला. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नडमधील बंजारा तरुणाला जेलच्या अधिकार्‍यांनी मारहाण केल्याने मृत्यू झाल्याचा आरोपही त्यांनी केला.

कलबुर्गी, पानसरे, दाभोळकर यांनी लिहिले म्हणून संपवण्यात आले. आज कोणीही सुरक्षित नाही. पत्रकारांनी विचार मांडले म्हणून त्यांनाही चॅनेलमधून जावे लागले आहे असा आरोपही त्यांनी केला.

Check Also

हिंदूत्ववादी राजकारणात मुस्लिमांचा ओढा उद्धव ठाकरे यांच्याकडे

साधारणतः २०१९ साली महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घटना घडली. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून शिवसेना बाहेर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *