Breaking News

अमृता फडणवीस राजकारणात सक्रिय? सूचक ट्विटद्वारे साधला सत्ताधाऱ्यांवर पुन्हा निशाणा बिगडे नवाब…नन्हें पटोलें, नॉटी नामर्द म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीकास्त्र

मराठी ई-बातम्या टीम

राज्यात भाजपाच्या हातातील सत्ता हिसकावून घेतल्यापासून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडून सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात अमृता फडणवीस या लवकरच राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आज त्यांनी सूचक ट्विट घेत करत बिगडे नवाब.. नन्हे पटोले आणि नॉटी नामर्द असे सूचक शब्द वापरत सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर निशाणा साधला.

महाविकास आघाडीतील महिला नेत्या आणि अमृता फडणवीसांचे ट्विटरवॉर अनेकदा पाहायला मिळाले आहे. आणि आता अमृता फडणवीसांनी पुन्हा एक जळजळीत ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे थेट नाव न घेता सूचक शब्दात ट्विट करत निशाणा साधला आहे. त्यामुळे हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. यात त्यांनी कुणाचे नाव जरी घेतले नसले तरी त्यांचं ट्विट पाहिल्यावर त्यांचा रोख कुणाकडे आहे, हे सहज दिसून येत आहे.

त्याचबरोबर त्यांनी ट्विट करत एक प्रश्नपत्रिका देत थोडक्यात उत्तर द्यावे …५० मार्क्स, असे प्रश्नपत्रिकेला हेडर देण्यात आलं आहे. त्यात पुढे…Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले …..या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? अशी जळजळीत टीका करण्यात आली आहे. त्याच ट्विटमध्ये पुढे…रिक्त स्थानो की पूर्ति करो …५० मार्क्स ! म्हणत,_____शराब नही होती ! हरामख़ोर का मतलब _____है और सुनने में आया है _____नामर्द है ! असे ट्विट अमृता फडणवीसांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात नॉटी हा शब्द खूप गाजत आहे, त्यातच संजय राऊतांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हजेरीवरून विरोधकांवर निशाणा साधत मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे नामर्द असतील अशी घणाघाती टीका केली होती. त्याला अमृता फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकही नेहमीच भाजपावर टीका करण्यात आघाडीवर असतात. दोन दिवसांपूर्वीच नवाब मलिकांनी किरीट सोमय्या ही भाजपची आयटम गर्ल असल्याची टीका केली होती. तर मोदींबाबतच्या वक्तव्याच्या वादानंतर नाना पटोले भाजपाच्या टार्गेटवर आहेत, काही दिवसांपूर्वीच अमृता फडणवीसांनी ट्विट करत नाना पटोलेंवरही निशाणा साधला होता.

दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अमृता फडणवीस यांच्या ट्विटबाबत विचारले असता ते म्हणाले की, त्या आमच्या सुनबाई आहेत. त्यामुळे त्यांच्या ट्विटवर उत्तर देणार नाही.

Check Also

शरद पवार यांनी सांगितला आर आर पाटील यांच्या राजकिय प्रवेशाचा किस्सा

देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे. एक वेगळी विचारधारा देशात निर्माण झाली आहे. ज्यांना स्वातंत्र्य चळवळशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *