Breaking News

निवडणूकीत उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खोचक टीका

मुंबईः प्रतिनिधी
आगामी निवडणूकांमध्ये उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून ठाकरे बंधू उत्तरप्रदेशमध्ये जावून आले.म्हणजे दोघेही निवडणूका डोळयासमोर ठेवून राजकारण करत असल्याची खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली.
मे महिन्यात लोकसभा निवडणूका होत आहेत कदाचित त्यासोबत विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. आता सगळेच पक्ष मतांकडे लक्ष ठेवून वागायला लागले, काम करायला लागले, बोलायला लागले आहेत. आत्ता उध्दव ठाकरे यांचं अयोध्येत शरयू नदीच्या काठावर जाणं होतं, ते निवडणूका डोळयासमोर ठेवूनच होतं. आणि राज ठाकरे यांचंही हिंदी भाषिकांसमोर जाणं आणि संवाद साधणं म्हणजे निवडणूकांचीच तयारी आहे असल्याचा आरोपही त्यांनी केला.

२० हजार कोटीच्या पुरवणी मागण्या सादर करणाऱ्या सरकारला कर्ज कशासाठी ?
सरकारच्या तिजोरीत पैसे आहेत म्हणूनच सरकार २० हजार कोटीच्या पुरवण्या मागण्यांवर खर्च करायला तयार आहे मग सरकार ५०० कोटी रुपये एखादया संस्थानाकडे मागते म्हणजे हे हास्यास्पद असून सरकारची आर्थिक विश्वार्हता किती कमी झाली आहे हे यावरुन दिसून येते अशी जोरदार टिका करतानाच मग कर्ज कशासाठी असा सवालही त्यांनी केला.
एखादया संस्थानाकडून बिनव्याजी पैसे घेण्याची वेळ जर सरकारवर आली असेल तर सरकारची आर्थिक अवस्था अधिक गंभीर झाली आहे. त्यामुळे याबाबत सरकारने खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली.
सरकारने सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी विविध भागामध्ये केलेला खर्चच कमी आहे. आम्ही सत्तेत असताना हिच मंडळी सिंचनाचा बॅकलॉग दूर करण्याचा आग्रह करायची. आम्ही ११ हजार कोटींपर्यंत निधी सिंचनावर खर्च केला आहे. हे सरकार मात्र ४-५ हजार कोटींवर निधी खर्च करायला तयार नाही. त्यामुळे सिंचनाचे सर्व प्रकल्प ठप्प असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
शिर्डीच्या संस्थानाकडून सरकारनं कर्ज घेतलं. या कर्जाची गरज का, तर निळवंडी धरणाचं काम पुढे नेण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. सरकारच्या लिक्विडिटीचा क्रंच आलेला आहे. सरकार अडचणीत आहे. सरकारनं सर्व मार्ग अनुसरल्यानंतर शेवटी कुणीच कर्ज देत नसल्याचं लक्षात आल्यावर आपल्या ताब्यातील आणि जिथे संचालक मंडळ नेमलेले आहे. त्या ठिकाणच्या शिर्डी संस्थानाकडून ५०० कोटीचे कर्ज घेण्याचा मार्ग अनुसरला आहे त्यामुळे राज्य सरकारची पत कमी झाल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

Check Also

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *