Breaking News

वैद्यकीय परीक्षांचे नवे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर होणार शासन निर्णय निर्गमित

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या यावर्षीच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या उन्हाळी पदवीपूर्व अंतिम वर्षाच्या परीक्षा १६ जुलैपासून घेण्याचे तात्पुरते वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले होते, मात्र विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा या उद्देशाने परीक्षेचे वेळापत्रक ४५ दिवस आधी जाहीर करावे आणि दरवर्षीप्रमाणे दोन पेपर मध्ये एक दिवसाचे अंतर ठेवण्यात यावे, ही बाब विचारात घेऊन मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.
वैद्यकीय परीक्षांबाबतची भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मार्गदर्शक तत्वे तसेच सूचना आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांची मते विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने परीक्षा न घेण्याच्या मुद्यावर काहीसा प्रतिकूल प्रतिसाद दिल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य लक्षात घेता सुरक्षेच्या सर्व बाबी विचारात घेऊन या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. याबाबत मुख्यमंत्र्यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे.
विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ देऊन विद्यार्थ्यांच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर त्यांना परीक्षा देता येईल. विद्यार्थी पालक यांच्यासमोरील अडचणी लक्षात घेऊन नियोजित परीक्षा पद्धती अधिक सोपी आणि सोयीची करण्याचा प्रयत्न अजूनही करण्यात येत आहे. याउपरही अपवादात्मक परिस्थिती उद्भवल्यास विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि सुरक्षा याबाबत ठाम भूमिका घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.
शासनाच्या या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक होणार असून सर्व वैद्यकीय विद्याशाखांच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री अमित देशमुख यांच्या विशेष प्रयत्नांमुळे ४६ जागांमध्ये वाढ
धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र विभागात पहिल्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतला असून या विद्यार्थ्याचा हा प्रवेश ऑल इंडिया कोट्यातून झाला आहे. राजकोट येथील डॉ. जिगरकुमार सामाणी हा या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमा घेणारा पहिला विद्यार्थी ठरला आहे. त्याने सोमवारी महाविद्यालयात हजेरी लावली. तब्बल ३१ वर्षानंतर म्हणजे महाविद्यालय स्थापनेनंतर या वैद्यकीय महाविद्यालयात ११ विषयांसाठी ४६ विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमास सुरुवात झाली आहे. या महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता मिळावी, याकरिता वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले होते.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *