Breaking News

आणि मिलिंद नार्वेकरांच्या विधानभवनातील उपस्थितीवरून आदित्य ठाकरेंनीच उपस्थित केला सवाल प्रश्न उपस्थित करताच मिलिंद नार्वेकर पडले बाहेर

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे विश्वासू म्हणून मिलिंद नार्वेकर यांना उभा महाराष्ट्र ओळखतो. मात्र राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर मिलिंद नार्वेकर हे सातत्याने अधिवेशन काळात विधानसभेतील किंवा विधान परिषदेतील आमदारांसाठी असलेल्या लॉबीत जाऊन शिंदे गटाच्या मंत्र्यांना भेटत असल्याची चर्चा सुरु होती. मात्र अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यपालांच्या अभिभाषणाला विधान भवनातील सेंट्रल हॉलमधील आमदारांच्या आसन व्यवस्थेत मिलिंद नार्वेकर हे बसलेले आढळून आले. त्यांच्या या हजेरीबाबत आदित्य ठाकरे यांनीच विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना विचारताच मिलिंद नार्वेकर यांनी सेंट्रल हॉलमधून काढता पाय घेतल्याचे दिसून आले.

उध्दव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी असल्याने महाविकास आघाडीच्या काळात विधान भवन ते मंत्रालय व्हाया वर्षा या सर्व ठिकाणी मिलिंद नार्वेकर यांचा राबता असे. तसेच शिवसेना पक्षांतर्गतही अनेक निर्णय प्रक्रियेत नार्वेकर यांना स्थान होते. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदेंशी चर्चा करण्यासाठी उध्दव ठाकरे यांचे विश्वासू शिलेदार म्हणून नार्वेकरच गेले होते. मात्र त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर मिलिंद नार्वेकर यांचा एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांसोबतच्या भेटी वाढत असल्याने उध्दव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकर यांना लांब ठेवण्यात आल्याची चर्चा सुरु झाली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नार्वेकर यांच्याबाबत सूचक वक्तव्य केले होते.

विशेष म्हणजे, नागपूर येथील हिवाळी अधिवेशन असो किंवा मुंबईतील अधिवेशन काळात मिलिंद नार्वेकर हे सातत्याने सभागृहाच्या सदस्यांसाठी असलेल्या लॉबीत जाऊन शिंदे गटाच्या मंत्र्यांना भेटत असत. त्यामुळे ठाकरे गटाच्या समर्थक आमदारांकडून सातत्याने याबाबतची चर्चा करण्यात येत होती. परंतु यावेळी ठाकरे सरकार नसताना राज्यपालांच्या अभिभाषणासाठी विधान परिषद आणि विधानसभेच्या सदस्यांसाठी सेंट्रल हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली होती. त्यातील एका आसनावर मिलिंद नार्वेकर हे बसल्याचे आढळून आले. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी थेट विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाच सवाल करत मिलिंद नार्वेकर हे आमदार आहेत का? असा सवाल करत मग ते आमदारांसाठी आरक्षित असलेल्या सभागृहात कसे असा सवाल केला. त्यावर मिलिंद नार्वेकर यांनी तात्काळ सभागृहा बाहेरचा रस्ता पकडला.

या घटनेमुळे मिलिंद नार्वेकर आणि ठाकरे गटात चांगलाच दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चेला एकप्रकारे पुष्टी मिळाल्याची चर्चा विधानभवनात सुरु झाली.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांनी मिलिंद नार्वेकर यांना विचारले असता ते म्हणाले, मिलिंद नार्वेकर हे आमच्या संपर्कात असल्याने ते अधिवेशन काळात येत असतात असे स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *