Breaking News

राज्यपाल कोश्यारी यांची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने भेट घेत दिले ‘हे’ निवेदन दिले २१ मागण्यांचे निवेदन

विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकरी व नागरिकांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत व दिलासा मिळण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची आज (२ ऑगस्ट रोजी) राजभवन येथे भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी ज्येष्ठ नेते व माजी मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अदितीताई तटकरे, आमदार सर्वश्री अनिल पाटील, नितीन पवार, चंद्रकांत नवघरे, सुनील भुसारा आदी नेते शिष्टमंडळात सहभागी झाले होते. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी हेक्टरी ७५ हजार तर फळपिकांसाठी हेक्टरी दीड लाख रुपयांची तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज्यपालांकडे करण्यात आली.

यावेळी दिलेल्या निवेदनातील मुद्दे खालील प्रमाणे

1)शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, वाहून गेल्या आहेत, शेजारील जमीनीचा गाळ वाहून येऊन त्याचा थर / रेजगा शेतात पसरल्यामुळे शेती नापिकी झाली आहे. मोठे ओढे व नाले यांचे पात्र वाढल्याने काठावरील सुपिक जमिन वाहून गेली आहे. या जमिनी पुढील काही वर्षे नापिक राहणार आहेत. शेतजमिन पूर्ववत करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासाठी भरीव आर्थिक मदत देण्यात यावी.

2)नगदी पिक म्हणून ओळखले जाणारे सोयाबीन पिकाचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. शिल्लक असणारी रोपे यांना फळ धारणा होणार नाही. विदर्भ आणि मराठवाडयामध्ये सोयाबीन या पिकाबरोबरच कापूस या पिकाचे सुध्दा मोठे क्षेत्र आहे. सदर पिकाचे सुध्दा मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

3)अतिवृष्टीमुळे अनेक विहीरीची पडझड झाली आहे. काही विहीरी वाहून गेल्या आहेत. काही विहीरी खचलेल्या आहेत. विशेष बाब म्हणून मनरेगा मधून सदर विहीर दुरुस्तीची परवानगी देण्यात यावी.

4)ठिबक सिंचन व तुषार सिंचन संच वाहून गेले आहेत. काही खराब झाले आहेत. यामध्ये योजनेचा लाभ घेतला असेल तर, पुढील ७ वर्षे पुन्हा ठिबक अथवा तुषार सिंचनचा लाभ देता येत नाही. तरी विशेष बाब म्हणून ७ वर्षाच्या आतील ठिबक व तुषार सिंचनास अनुदान द्यावे व संच बसविणेस मदत करण्यात यावी.

5)विदर्भ मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांचे धारण क्षेत्र जास्त आहे. त्यामुळे नुकसान भरपाईची २ हेक्टर ची कमाल मर्यादा एक विशेष बाब म्हणून शिथील करावी व मदत वाटप करावी.

6)अतिवृष्टी इतकी मोठ्या प्रमाणात झाली आहे की यामध्ये अनेक जनावरे व पाळीव प्राणी वाहून गेले आहेत. बऱ्याच जनावरांचा अद्याप शोध लागत नाही. तरी मदतीसाठी पोष्ट मार्टम रिपोर्टची अट शिथिल करुन स्थानिक पोलीस पाटील, सरपंच व पशु वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला ग्राह्य धरुन मदत वाटप करण्यात यावी.

7)विदर्भ व मराठवाड्यात रस्त्याचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. परंतु या अतिवृष्टीत ग्रामीण मार्ग, इतर जिल्हा मार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या रस्त्याची दुरुस्ती तातडीने हाती घेणे आवश्यक आहे.

8)अतिवृष्टीमुळे विज वितरण व्यवस्था पूर्णत: कोलमडली आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. डी.पी./ट्रान्सफार्मर नादुरुस्त झाले आहेत. त्यांची दुरुस्ती करुन उपलब्धता करुन द्यावी. आवश्यकता वाटल्यास जिल्हा नियोजन समितीचा निधी वापरण्यात यावा.

9)बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे पिक कर्ज घेतले आहे. परंतु पिके वाहून गेल्याने हे पिक कर्ज भरणे शेतकऱ्यांना शक्य होणार नाही. तरी संपुर्ण कर्ज माफी करणे आवश्यक आहे.

10)अतिवृष्टीमध्ये घरांची पडझड होऊन काही ठिकाणी घरे वाहून गेली आहेत. त्यामुळे अंशत: पडलेल्या घरांना व पुर्ण वाहून गेलेल्या घरांना त्वरीत मदत आवश्यक आहे.

11)शाळा, इमारती, शासकीय इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे करुन त्यांची तात्काळ दुरुस्ती होणे आवश्यक आहे.

12)राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या नाल्यांना रिटेनींग वॉल नसल्याने विशेषत: यवतमाळ जिल्हयात नाल्यांचे पाणी शेतात घुसल्यांने पिकांचे व जमिनीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे.

13)अपर वर्धा, लोअर वर्धा, बेंबळा, लालनाला व बोर धरण ही यवतमाळ जिल्हयातील धरणे १००% भरली आहेत. मध्यप्रदेश मधील देखील धरणे पूर्ण भरली असल्याने पाण्याचा विसर्ग अपर वर्धा या धरणात येतो. या विसर्गामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून मोठया प्रमाणात शेती खरडून व वाहून गेली आहे.

14)शेतावर जाण्यासाठीचा पाणंद रस्त चांगले नसल्याने बरेच शेतकरी उन्हळयामध्येच शेतातील गोठयात खते व चारा साठवणूक करतात. यांचेही पुरामुळे खुप मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. गोठयातील जनावरे व जनावरांचे खाद्य ही वाऊन गेले आहे. याचे तात्काळ पंचनामे करुन मदत देणेसाठी शासनास सुचित करणे आवश्यक आहे.

15) नांदेड जिल्हयातील माहूर देवस्थानची जमिन स्थानिक शेतकरी पिढयानपिढया वहिवाट करीत आहेत. ७/१२ मध्ये नावे नसल्याने व पीक पाहणीत नाव येत नसल्याने त्यांना कोणतेही अनुदान मिळत नाही. मात्र ७/१२ चे इतर हक्कात नावे नोंदवून नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळावी अशी त्यांची मागणी आहे. त्याचा सकारात्मक विचार करावा.

16)अतिवृष्टीमधील तातडीची मदत म्हणून जिल्हा प्रशासनामार्फंत जाहीर करण्यात आलेली रु.५००० रक्कम अद्यापपर्यंत बऱ्याच जणांना मिळाली नाही, ही बाब नांदेडच्या दौऱ्यामध्ये निदर्शनास आली. सदर बाब गंभिर असून प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलली पाहिजेत.

17)भारतीय स्टेट बँकेसारख्या राष्ट्रीयकृत बँका पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करतात तसेच बँकेतील अधिकारी पीक कर्जाविषयी उडवाउडवीची उत्तरे देतात अशा स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. याबाबत वित्त विभाग व सहकार विभागाने संबधितांना कडक सुचना देणे आवश्यक आहे.

18) श्री.विजय पुजाराम शेळके (वय-४२) रा.पांचोदा ता.माहूर जि.नांदेड या शेतकऱ्यांने अतिवृष्टी व पुरसंकटामुळे आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. तरी संबधित कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यावर त्वरित कार्यवाही करावी.

19)करमोडी ता.हदगांव जि.नांदेड गावमध्ये ऊस पिकाचे क्षेत्र मोठया प्रमाणात असून कयाधू नदी काठी क्षेत्राचे व शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच पी एम किसान योजनेअंतर्गत गावातील ३ लाभार्थी जिवंत असताना त्यांना मयत दाखवल्याने ते अनुदानपासून वंचित आहेत. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी.

20)कामठा बु.ता.अर्धापूर जि.नांदेड येथील नाल्यावरील पुल पुरात वाहून गेल्यामुळे या पुलावरुन शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रंचड अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी नवीन पुल मंजूर होऊन पूर्ण होईपर्यंत तातडीने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

21)कुरुंदा, ता.वसमत या गावानजिक असलेल्या नदीचे पात्र अरुंद असल्यामुळे अचानक मोठया प्रमाणात अतिवृष्टीमुळे पुराचे पाणी वाढल्याने नदीचे पाणी गावात घुसून मोठया प्रमाणात गावातील राहत्या घरांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी तातडीने मदत देणे आवश्यक आहे.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *