Breaking News

अखेर कोतवालांच्या आंदोलनाला यश

मानधनात २५०० रूपयांची वाढ करण्यात येत असल्याची महसूल मंत्र्यांची माहीती

मुंबई : प्रतिनिधी

मागील अनेक वर्षांपासून मानधनात वाढ करण्याची कोतवाल कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. तसेच काही दिवसांपासून मानधनात वाढ करावी यासाठी राज्यभरात कोतवाल संघटनेकडून धरणे आंदोलन आणि भीक मांगो आंदोलन करण्यात आले. अखेर या आंदोलनाची दखल राज्य सरकारने घेत कोतवालांच्या मानधनात २५०० रूपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येथून पुढे कोतवालांना ५ हजार रूपयांऐवजी ७ हजार ५०० रूपये मिळणार असून तसा निर्णय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

राज्यभरात १२ हजार कोतवाल कार्यरत असून अजून ६ हजार कोतवालाची पदे भरण्यात येणार आहेत. ज्या कोतवाल कर्मचाऱ्यांची सेवा १० ते २० वर्षे झाली आहे, अशांना मानधनात ३ टक्के वाढ देण्यात येणार आहे. तर ज्यांची सेवा २० ते ३० वर्षे आणि ३१ वर्षापेक्षा जास्त झालीय त्यांना अनुक्रमे ४ आणि ५ टक्के वाढ देणार आहे. तसेच ज्यांची ५० वर्षे सेवा झालीय अशा कोतवालांना १५ हजार रूपये मानधन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय ड वर्गात काम करणाऱ्या कोतवालांसारख्या कर्मचाऱ्यांनाही त्यांची पूर्ण नियुक्ती होईपर्यंत १५ हजार रूपयांचे मानधन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय कोतवाल कर्मचाऱ्यांना अपघात विम्याचे संरक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय अटल निवृत्ती वेतन योजनेतही त्यांना समाविष्ट करण्यात येणार असून त्याचे सर्व पैसे राज्य सरकार भरणार आहे. तसेच त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभही देण्यात येणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *