Breaking News

जयंत पाटील यांचा टोला, ….डोक्यात फक्त सत्ताच राहिली विचार नाही

आगामी लोकसभा निवडणूकीला आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. यापार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाचे राजकिय पक्षाचे धोरण ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांचे शिबिर आयोजित करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचेही शिर्डी येथे कार्यकर्त्यांचे आजपासून दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरात उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारातून करण्यात आली. या विचारातून सत्ता मिळवायची आणि त्याचा वापर समाजासाठी करायचा असा विचार करण्याचे ठरविण्यात आले. मात्र पक्षाच्या स्थापनेपासून नेहमी सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ज्या विचारासाठी सत्ता मिळवायची होती. तो विचारच राहिला नाही असा टोला लगावत म्हणूनच सत्ता कायम डोक्यात ठेवणारेच तिकडे गेल्याचा आरोपही केला.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले, पण काही जणांनी ज्या विचारासाठी पक्षाची स्थापना केली. त्या विचारावर आजही आमच्यासारखे विचारावर निष्ठा ठेवणारे असल्याने आम्ही शरद पवार यांची साथ सोडली नसल्याचेही स्पष्ट करत त्या फक्त विचार डोक्यात राहिल्यानेच आम्ही पक्षाच्या नेत्याशी एकनिष्ठ राहिल्याचे सांगितले.

या शिबिराला मार्गदर्शन करताना जयंत पाटील म्हणाले की, नेत्यांनी पक्ष सोडल्यामुळे तुम्हाला पुढे बसण्याची संधी मिळाली नाहीतर तुम्हाला पुढे येण्याची संधी मिळाली नसती. त्यामुळे पुढे बसलेल्यांनी गेलेल्यांचे आभार माना. आपल्या नेत्यांना त्रास देण्याचे काम झाले. अनिल देशमुखांसारख्या नेतृत्वाला तुरुंगात जायची वेळ आली. नवाब मलिकांवर काय प्रसंग आला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या सर्वांना या त्रासातून पुढे जाताना शरद पवारांची साथ न सोडण्याचं आम्ही ठरवलं. आम्ही शाहू-फुले आंबेडकरांचे विचार मांडतो. शरद पवारांनी उभ्या आयुष्यात हा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाची ज्योत पेटवली. महात्मा फुलेंनी ज्ञानाची ज्योत, छत्रपती शाहू महाराजांनी समतेची ज्योत आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी अस्मितेची ज्योत आपल्या मनात पेटवली. या सर्व महापुरुषांचा आदर्श घेऊन डॉ. बाबासाहेबांनी संविधानाची चौकट आखली असेही सांगितले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, समाजात अनेक घटक मागे राहिले त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून पुढे आणण्याचे काम छत्रपती शाहू महाराजांनी केले. त्यानंतर समाजात केवळ जातीभेद नसून स्त्री-पुरुष भेदही आहे. त्यातून महात्मा फुलेंनी महिलांना पुढे आणण्याचा विचार दिला. हाच विचार घटनेच्या चौकटीत बसवण्याचं महान काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. राष्ट्रवादीला पुरोगामी विचारांची ज्योत पेटवत राहायची आहे. पुढील २ दिवसांच्या शिबिरात अनेक विचार आपल्यासमोर येतील. देशातील परिस्थिती आपल्या समोर येईल. आपण बोलण्यात कमी पडतोय. समोरच्या बाजूने जाहिरात प्रचंड आहे. त्यामुळे आपले बोलणे दाखवले जात नाही किंवा प्रचार होत नाही. लोक ऐकत असतात. आपण सगळ्यांनी बोलले पाहिजे. ज्या विचारांसाठी राजकारण करतोय त्याला महत्त्व दिले पाहिजे असेही आवाहन केले.

जयंत पाटील पुढे बोलताना म्हणाले की, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कष्टानं काम केलं आहे. खासदार कोल्हे यांनी तर शेतकरी आक्रोश मोर्चा काढून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. आता मात्र त्यांना निवडणुकीत पाडण्याचा विडा काही जणांनी उचलला आहे. पण जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि आई भवानींचा तुम्हाला आशिर्वाद आहे तोपर्यंत तुम्ही घाबरण्याचं काहीच कारण नाही. सर्व पक्ष तुमच्यासोबत उभा आहे अशी ग्वाहीही दिली.

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने समतेचा विचार पुन्हा महाराष्ट्रात आणि देशात टिकावा यासाठी सुरू केलेली या शिबिराची ज्योत मला खात्री आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचे काम तुम्ही आम्ही सर्व मिळून करू असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

आपल्या समोर देखील येणाऱ्या काळामध्ये संघर्ष उभा राहिलेला आहे. येणारी निवडणुकीचं वर्ष म्हणजे संघर्षाचे वर्ष आहे .या निवडणुकीचा काळ २०२४ चा होणार आहे. या काळामध्ये आपण सर्वजणांनी वैचारिक संघर्ष करण्यासाठी भविष्य काळामध्ये ठामपणाने काम करण्याची गरज आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *