Breaking News

उध्दव ठाकरेंचे खुले आव्हान: हिंदूत्वावरून होऊनच जाऊ द्या, या एका व्यासपीठावर शिंदे गटासह भाजपालाही दिले आव्हान

माझी शस्त्रक्रिया झाला. माझी बोटंही हालत नव्हती. त्यावेळी ज्यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यांनीच गद्दारी करत पाठीत खंजीर खुपसला आणि ज्यांच्यावर लक्ष ठेवत होतो. त्यांनी मात्र सोबत केली. मी काँग्रेस, राष्ट्रीवादीसोबत आघाडी केली म्हणून मला हिंदूत्व सोडलं म्हणता. या एकदा हिंदूत्वावरून होवूनच जाऊ द्या तुम्ही सगळे जण एका व्यासपीठावर या असे खुले आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपाला देत म्हणाले, तुम्ही सगळे जण आणि मी एकटा. अन मी सांगतो माझे वडिलोपार्जित हिंदूत्व.

शिवाजी पार्क येथील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी हिंदूत्वाच्या भूमिकेवरून सातत्याने शिंदे गट आणि भाजपाकडून होत असलेल्या टीकेचा समाचार घेत उध्दव ठाकरे यांनी खुले आव्हान दिले.

बाळासाहेब ठाकरे यांनी यापूर्वीच सांगितलंय आमचं हिंदूत्व हे शेंडी-जाणव्याचं हिंदूत्व नाही किंवा देवळात घंटा बडविणारं हिंदूत्व नाही म्हणून. आजही मी तेच सांगतोय. आमचं हिंदूत्व हे राष्ट्रीयत्वाशी आणि इथल्या मातीशी जोडणारे आहे. धर्म घरात ठेवतो आणि घरातून बाहेर पडल्यानंतर आमची नाळ जोडली जाते ती इथल्या राष्ट्राशी मातीशी. ज्यांच्या नेत्यांनी पाकिस्तानच्या जीनांच्या कबरीवर जाऊन माथा टेकवला आणि ज्यांनी आमंत्रण नसताना पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाल्ला ते आम्हाला हिंदूत्व शिकविणार का? असा सवाल करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला त्यांनी खोचक टोला लगावला.

आमचं हिंदूत्व म्हणजे हातात जपमाळ आणि समोर अतिरेकी स्टेनगन घेवून आला तर राम राम म्हणून पळवून लावणार का? असलं हिंदूत्व नाही. जर अतिरेक्याच्या हातात स्टेनगन असेल तर आमच्याही हातात स्टेनगन असायला हवी अन त्याच्यानेच उत्तर देणारे आमचं हिंदूत्व आहे. काही दिवसांपूर्वी ज्म्मू काश्मीरमधील औरंगजेब नावाच्या पोलिस अधिकाऱ्याला अतिरेक्यांनी पळवून नेलं. काही दिवसानंतर त्याचं प्रेत सापडलं. त्याचे हाल हाल करून मारलं. त्याला का मारलं औरंगजेब पण मुस्लिम होता आणि अतिरेकीही मुस्लिम होते. पण त्याला का मारलं तर तो भारताच्या बाजूने लढत होता म्हणून. देशासाठी इथल्या मातीसाठी जो कोणी आपले प्राण देईल भले तो मुस्लिम असला तरी तो आमचा आहे म्हणणारं आमचं हिंदूत्व आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आज राष्ट्रीय स्ंवयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे बोलले. चांगले बोलले. त्यांनी आज स्त्री शक्ती आणि पुरूष शक्तीमध्ये समानता हवी असे वक्तव्य केले. त्यामुळे मला त्यांना दोन प्रश्न विचारायचे आहेत. त्यातील पहिला ज्या अंकिता भंडारीचा हत्या करण्यात आली ते ठिकाण होते भाजपाच्या एका नेत्याच्या हॉटेलचे. आता तीची आई म्हणते माझ्या मुलीच्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या आणि फाशी देणे होत नसेल तर त्याला माझ्या घराच्या समोर आणून जाळा हा स्त्री शक्तीचा आक्रोशच आहे ना? मग त्यावर बोला की. याशिवाय गुजरात येथील दंगलीत बिल्कीस बानो हीच्या तीन वर्षाच्या मुलीला आपटून मारण्यात आलं. आणि ती गरोदर असताना तिच्यावर अत्याचार करण्यात आले. त्याची शिक्षा भोगत असलेल्या आरोपींना तेथील सरकारने सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर गावोगावी त्या आरोपींचा सत्कार करण्यात आला. मग या स्त्री शक्तीबाबत जे घडलं त्याचं काय करणार? असा खोचक सवालही त्यांनी मोहन भागवत यांना विचारला.

Check Also

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत फक्त ४३ टक्के मतदान

महाराष्ट्रासह देशभरातील ८२ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *