Breaking News

एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही गद्दारी नाही तर गदर केलाय पण गद्दारी झाली… शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर

आम्ही गद्दारी केली नाही, तर गदर केलाय. गदर म्हणजे क्रांती. आम्ही गद्दार नाही, तर बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले. आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झालीय. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती टोळी म्हणायचं का? सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण? जनतेला समजलं आहे. म्हणून जनता आमच्याबरोबर आहे असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या टीकेला दिले.

शिंदे गटाच्यावतीने आयोजित बीकेसी मैदानात आयोजित दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते. यावेळी शिंदे समर्थक सर्व आमदार, खासदार उपस्थित होते.

शिवसेनेत ४० आमदारांनी बंड केल्यापासून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सातत्याने त्यांच्यावर बाप पळवणारी टोळी म्हणत टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आम्हाला म्हणतात बाप चोरणारी टोळी निर्माण झालीय. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला, असा पटलवार शिंदे यांनी केला.

सहन करण्याची एक मर्यादा असते. सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली, मग खरे गद्दार कोण? जनतेला समजलं आहे. त्यामुळे जनता आमच्याबरोबर आहे. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही जे पाप केलं, ते शिवसैनिक कधीही विसरणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील जनताही तुम्हाला माफ करणार नाही. तुम्ही वैचारिक व्यभिचार केला आहे. तुम्ही जे पाप केल आहे, त्यासाठी आधी बाळासाहेबांच्या शिवतीर्थावरील समाधीवर गुडघे टेका आणि माफी मागा, मग आमच्यावर बोला, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.  बाळासाहेबांचे विचार तोडून, मोडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आमदारांनी विरोध केला, मी त्यांना सांगितलं, मला काही नको. पण, छातीवर दगड ठेऊन मी त्यांच्यासोबत राहिलो. तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती, मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला. नारायण राणे बोलले, बाळासाहेब ठाकरे असते हा मुख्यमंत्री झाला नसता. तुमची लायकी तुम्ही काढताय, असा घणाघातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

कोणत्या समाजासह तुम्ही राहिला. मराठा मोर्चे निघाले तेव्हा मुक मोर्चाला मुका मोर्चा म्हणाला. मराठा समाज सांगतो बरोबर, त्यांच्या वाट्याला कोणी जाऊ नये. मराठा, ओबीसी, एसी, एसटी हे सगळे आपले आहेत. या राज्यात कोणावरही अन्याय होणार नाही. सर्वांना समान न्याय दिला जाईल. मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

तुम्ही आम्हाला काय काय म्हणालात. ४० रेडे काय, गटारातील घाण काय, डुक्कर काय, टपरीवाला, रिक्षावाला, पानवाला आणि आणखी बरंच काही म्हटले. असं म्हणणारे आता कोठे आहेत? आपल्यावर बोलल्यावर काय होतं माहिती आहे ना असा टोलाही त्यांनी यावेळी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.

या देशाच्या उभारणीत आरएसएसचं मोलाचं योगदान आहे. या देशावर आलेली प्रत्येक आपत्ती आणि संकटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एकदिलाने काम करताना आपण पाहिलं आहे. जेव्हा जेव्हा आपत्ती-संकट येतं तेव्हा आरएसएस पुढे असते. राष्ट्र उभारणीच्या पवित्र कार्यात या संघटनेचा हात कुणीच धरू शकत नाही. तुम्ही आरएसएसची आणि पीएफआयची तुलना करता. अरे थोडी तरी काही तरी वाटली पाहिजे. मनाची नाही, तर जनाची तरी वाटली पाहिजे. आरएसएसवर बंदीची मागणी अतिशय हास्यास्पद आणि मुर्खपणाची आहे असेही ते म्हणाले.

तुमचा कारभार कुणालाही आवडत नव्हता. कोविड कोविड करून तुम्ही सर्वांना घरात बसवलं. दुकानं बंद केली, मंदिरं बंद केली, बाजारपेठा बंद केल्या, पण तुमची दुकानं सुरूच होती. कसली दुकानं सुरू होती हे मी बोलत नाही, पण चालू होती हे मला माहिती होतं. माझ्याशिवाय जास्त कुणाला माहिती असणार आहे असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या आमंत्रणावर शरद पवार यांची स्पष्टोक्ती, …राजकिय असोसिएशन कधीही नाही

लोकसभा निवडणूकसाठी आजपर्यंत तीन टप्प्यात मतदान झाले. या तिन्ही टप्प्यातील मतदानाची आकडेवारी पाहिली तर ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *